22 September 2020

News Flash

‘हार्बर’वर १२ डब्यांच्या गाडय़ा ऑक्टोबरमध्येच

हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या नशिबी असलेले जुन्या गाडय़ांचे नष्टचक्र संपणार नसले, तरी या मार्गावरील गाडय़ा नऊऐवजी बारा डब्यांच्या चालवण्यासाठी अजून सहा महिनेच वाट पाहावी लागणार आहे.

| April 9, 2015 12:06 pm

हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या नशिबी असलेले जुन्या गाडय़ांचे नष्टचक्र संपणार नसले, तरी या मार्गावरील गाडय़ा नऊऐवजी बारा डब्यांच्या चालवण्यासाठी अजून सहा महिनेच वाट पाहावी लागणार आहे. हार्बर मार्गावरील गाडय़ांचे डबे वाढवल्यानंतर या मार्गावरील वेळापत्रकातही बदल होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र या मार्गावरील गाडय़ांच्या फेऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता नसून केवळ गाडय़ांच्या वेळा बदलतील, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
हार्बर मार्गावर धावणाऱ्या सर्व गाडय़ा नऊ डब्यांच्या आहेत. गेल्या काही वर्षांत हार्बर मार्गावरील प्रवासी संख्या वाढल्याने ही नऊ डब्यांची गाडी अपुरी पडत आहे. मात्र हार्बर मार्गावरील अनेक स्थानकांमधील प्लॅटफॉर्मची लांबी १२ डब्यांच्या गाडय़ांसाठी योग्य नसल्याने या मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा चालवण्यात अडथळा येत आहे. मात्र मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि वडाळा येथील प्लॅटफॉर्मच्या लांबीचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
प्लॅटफॉर्मच्या लांबीबरोबरच मध्य रेल्वेवर असलेल्या गाडय़ांची कमतरता, हादेखील हार्बर मार्गावरील गाडय़ांबाबत कळीचा मुद्दा आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर बंबार्डिअर गाडय़ा येण्यास सुरुवात झाल्यावर आणि मध्य रेल्वेवरील डीसी-एसी परिवर्तन पूर्ण झाल्यावर मग पश्चिम रेल्वेवरील डीसी-एसी गाडय़ा मध्य रेल्वेवर येणार आहेत. त्या वेळी मध्य रेल्वेवरील डीसी विद्युतप्रवाहावर चालणाऱ्या गाडय़ांच्या मदतीने हार्बर मार्गावरील सर्व गाडय़ा १२ डब्यांच्या करता येतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, यासाठी पुढील सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
हार्बर मार्गावरील गाडय़ा १२ डब्यांच्या झाल्यावर प्रत्येक गाडीला प्रत्येक स्थानकात थांबण्यासाठी आणि सुटण्यासाठी लागणारा कालावधी वाढणार आहे. त्याचा परिणाम हार्बर मार्गाच्या वेळापत्रकावरही होणार असून हे वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे. सध्या या मार्गावरील फेऱ्यांमध्ये अजिबात वाढ होणार नसली, तरी डब्यांची संख्या वाढल्याने प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी खात्री या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2015 12:06 pm

Web Title: 12 coach trains on the harbour from october
टॅग Harbour
Next Stories
1 जलतरण तलवातील मृत्यूबद्दल प्रशिक्षक, कंत्राटदारास दंड
2 ‘३५ हजार कचराकुंडय़ा गेल्या कुठे’
3 सागरी विज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या संधी
Just Now!
X