युरियामिश्रित धान्य खाल्ल्याने विषबाधा होऊन बारा गायींचा तडफडून मृत्यू झाला, तर गंभीर असलेल्या दहा गायींना वाचवण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना रात्रभराच्या प्रयत्नांनंतर यश आले.
नारायणगड संस्थानजवळ एका मालमोटारचालकाने युरियामिश्रित धान्य उघडय़ावर टाकून दिले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून घटनास्थळी जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे यांनी भेट देऊन पाहणी केली. बीड तालुक्यातील नारायणगड संस्थानजवळील यात्रा मदानावर मालमोटार (एमएच ४४ ५१८१) चालकाने स्वच्छ केली. या वेळी गाडीतील वाळूमिश्रित काही धान्य मोकळ्या जागेत पडले. थोडय़ा वेळानंतर येथे आलेल्या संस्थानच्या १६०पकी काही जनावरांनी हे धान्य खाल्ले. मात्र, त्यामुळे २० जनावरांना विषबाधेचा त्रास सुरू झाला. गायी व लहान वासरे तडफडून जमिनीवर पडली.
माहिती मिळताच पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. डी. मोरे, या परिसरातील डॉ. शैलेश केंडे, डी. एल. खाडे, पी. डी. आघाव या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत ११ गायी मरण पावल्या होत्या, तर अन्य जनावरे तडफडत होती. त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. सर्व जनावरांवर प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आले. या प्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.