नाशिक परिमंडळात विविध वर्गवारीतील ५.२८ लाख ग्राहकांकडे वीज देयकापोटी तब्बल १२०.७३ कोटी रुपये थकले आहेत. वारंवार आवाहन करूनही ग्राहक थकबाकी भरत नसल्याने वीज पुरवठा नियमानुसार या थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा बंद करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. ज्या ठिकाणी वित्तहानी कमी आणि वसुली प्रमाणात आहे, असे भाग भारनियमन मुक्तीचा आनंद घेऊ शकतात. परंतु, ज्या ठिकाणी ग्राहक नियमित वीज देयके भरत नाहीत आणि अनधिकृतरित्या विजेचा वापर करतात त्या ठिकाणी ग्राहकांना भारनियमनाला सामोरे जावे लागते. नाशिक शहर मंडळात एकूण १३.९४ कोटीची थकबाकी आहे. त्यात घरगुती ७,९३२७ ग्राहकांकडे सर्वाधिक म्हणजे ८ कोटी २० लाखाची थकबाकी आहे. त्यानंतर १३,९४२ व्यावसायिक वीज ग्राहकांकडे ४ कोटी ३० लाख, औद्योगिक एक कोटी २८ लाख अशी ही थकीत रक्कम आहे. नाशिक ग्रामीण परिमंडळातील थकबाकी ४२.६१ कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यात दीड लाखाहून अधिक घरगुती ग्राहकांकडे २३.०२ कोटी, व्यावसायिक ५.६९ कोटी, औद्योगिक ४.१७ कोटी अशी थक्कत रक्कम आहे. या मंडळात पाणी पुरवठय़ाची दीड कोटीच्या आसपास थकबाकी आहे.