शहराच्या रस्ता रुंदीकरणात ज्या अनुसूचित जाती व नवबौद्धांची घरे पाडली गेली, अशा नागरिकांसाठी सरकारच्या वतीने रमाई घरकुल योजनेंतर्गत १२० सदनिका उभारण्यात येणार आहेत. दि. २३ जानेवारीला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले जाणार आहे. शहरातील हर्सूल येथे होणाऱ्या या प्रकल्पासाठी १८० लाभार्थ्यांची यादी प्रशासनाने तयार केली आहे.
योजनेसाठी केंद्र सरकारकडून दोन लाखांचे अनुदान असून, महापालिकेच्या फंडातून प्रत्येकी ३५ हजार रुपये मंजूर करण्यात येणार आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत या घरकुल योजनेला मान्यता देण्यात आली. या योजनेतील लाभार्थी ठरविताना घोटाळे होणार नाहीत याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे नगरसेवक समीर राजूरकर यांनी सांगितले. एकाच घरातील चार-चार व्यक्ती अशा योजनेचा लाभ घेतात. त्यामुळे लाभार्थ्यांची यादी लावण्यापूर्वी नीट खातरजमा करा, असे ते म्हणाले. या योजनेतील प्रत्येक सदनिका २६९ चौरस फुट चटई क्षेत्राची असून बहुमजली इमारतीत ५१२ सदनिका बांधण्याचा ठराव १८ फेब्रुवारी २०१२ रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण बैठकीत मंजूर करण्यात आला होता.
या संदर्भात दरपत्रके प्राप्त झाली असून, टॅप इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या मुंबईतील कंपनीकडून काम करून घेतले जाणार आहे. हा ठेकेदार नीट काम करेल का याची खातरजमा करा, तसेच सदनिकांच्या दर्जाबाबतही विशेष लक्ष द्या, असे आदेश स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आले. महापालिकेच्या फंडातून या योजनेसाठी ४२ लाख तरतुदीची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वसाधारण सभेत हा ठराव पाठविण्यास मान्यता देण्यात आली.