स्वातंत्र्य लढय़ात क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान राहिलेल्या येथील अभिनव भारत स्मारकातील निवडक १२५ चित्रांचे नुतनीकरण ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले असून या छायाचित्रांचा लोकार्पण सोहळा १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता शिवसेना नेते आ. रवींद्र मिर्लेकर आणि अभिनेते शरद पोंक्षे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
अभिनव भारत या मंदिराचे १० मे १९५३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या मंदिराच्या सभागृहात १८५७ पासून १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीच्या समराचे दर्शन घडविणारी छायाचित्रे आहेत. ]
मंगल पांडे यांचे हौतात्म्य, राणी लक्ष्मीबाई यांचे रणकौशल्य, तात्या टोपे, ग्वाल्हेर येथील पेशव्यांचा दरबार, वासुदेव फडके यांचा पराक्रम, चाफेकर बंधुंनी केलेला रँडचा वध, सेनापती बापट यांचे शत्रुच्या शिबीरातील वास्तव्य, उधमसिंग यांनी घेतलेला प्रतिशोध, नेताजी सुभाषचंद्र यांची संघटना अशा सर्व प्रसंगांवरील चित्रांमुळे स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास चित्रपटाप्रमाणे डोळ्यांसमोर उभा राहतो.
सुमारे ५० वर्षांपूर्वी प्रसिध्द चित्रकार वा. घ. कुलकर्णी यांनी जलरंग वापरून अभिनव भारत येथील स्मारकात स्वातंत्र्य संग्रामाची चित्रे तयार केली होती. अलीकडील काळात ही चित्रे जीर्ण व फाटकी झाल्याने त्यांचे नुतणीकरण करणे गरजेचे झाले होते.
रौप्यमहोत्सवी स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनानिमित्त ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांनी या चित्रांचे नुतनीकरण करून ही चित्रे स्मारकात पुन्हा लावण्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार निवडक १२५ चित्रांची छायाचित्रे प्रतिष्ठानचे छायाचित्रकार संचिन निरंतर यांनी काढली. नवीन रूपातील ही छायाचित्रे आता अभिनव भारतचे आकर्षण ठरणार आहे.