जिल्ह्य़ातील वरणगाव येथे मुख्यालय असलेल्या तसेच संपूर्ण महाराष्ट्रात शाखांचा विस्तार असलेल्या सहकार मित्र चंद्रकांत बढे पतसंस्थेत सुमारे १३ कोटी पाच लाख ९० हजार रुपयांचा अपहार झाल्याचा गुन्हा नव्याने उघडकीस आला असून या प्रकरणी पतसंस्थेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. बढे पतसंस्थेचा संस्थापक अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच तत्कालीन संचालक मंडळाचा या अपहार प्रकरणात सहभाग असून पदाचा दुरूपयोग तसेच बनावट कागदपत्रे तयार करून कर्ज घेणे असे या अपहाराच्या गुन्ह्य़ाचे स्वरुप आहे. नाशिक येथील मक्तेदार रामराव पाटील आणि
त्यांच्या कुटुंबियांच्या नावाने चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी  बनावट कागदपत्रे तयार करून आणि संबंधितांची स्वाक्षरी करून १३ कोटी पाच लाख ९० हजार रुपयांचे बनावट प्रकरण करून कर्ज घेतल्याचा हा गुन्हा आहे. पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत बढे, महाव्यवस्थापक संजय नाईक तसेच तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध हा गुन्हा रामराव पाटील यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.