कोल्हापूर शहारामध्ये टोल आकारणी होण्याच्या पाश्र्वभूमीवर मनसेने पाच दिवसांपूर्वी टोल नाके पेटवून देण्याबरोबर त्याची नासधूस केली होती. या प्रकरणी जिल्हाध्यक्ष, शहरप्रमुख, जिल्हा सचिव यांच्यासह तेरा जणांना रविवारी पोलिसांनी अटक केली. वैयक्तिक जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. कोल्हापूर जनतेवर टोलची आकारणी करण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून सुरू आहे. मुळात आयआरबी कंपनीने केलेल्या रस्त्याच्या कामांचा दर्जा निकृष्ट असून त्याविरुद्ध गेली दोन वर्षे आंदोलन सुरू आहे. राज्य शासनाने अलीकडे टोल आकारणीच्या हालचाली पुन्हा सुरू केल्या. या पाश्र्वभूमीवर ३० एप्रिल रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मनसेच्या कार्यकर्त्यांनी अचानक आंदोलन सुरू केले. फुलेवाडी येथील टोलनाक्याची मोडतोड करून त्यांनी तो पेटवून दिला. तर उचगाव व सरनोबतवाडी येथील टोल नाक्यांची प्रचंड नासधूस केली. या प्रकरणाची जबाबदारी मनसेने घेतली होती.     
आंदोलन होऊन तब्बल पाच दिवस उलटल्यानंतर पोलीस यंत्रणेला जाग आली. जुना राजवाडा पोलिसांनी फुलेवाडी नाका पेटविल्याप्रकरणी जिल्हाध्यक्ष अभिजित साळोखे, जिल्हा सचिव प्रसाद पाटील, शिवाजी कुंभार या तिघांना अटक केली. तर उचगाव व सरनोबतवाडी टोल नाके फोडल्याप्रकरणी तालुकाध्यक्ष अभिजित पाटील, राहुल कोतेकर, राजू यादव, दिगंबर नलवडे, अविनाश माने, सुनील काळे, दिनेश प्रधाने, अमोल कुले, संदीप वडणकर या मनसे कार्यकर्त्यांना गांधीनगर पोलिसांनी अटक केली. आजच्या कारवाईनंतर बोलताना शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी यापुढे आयआरबी कंपनीने टोलआकारणी प्रयत्न केल्यास मनसे स्टाईलने अधिक उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.