जिल्ह्य़ातील नऊ मध्यम आणि चार लघु प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
मध्यम, लघु प्रकल्पांमध्ये उपलब्ध पाणीसाठा, आरक्षणाची मागणी आणि गरज या संदर्भात र्सवकष आढावा घेण्यात आल्यावर दरवर्षी पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात येते. यंदा पावसाळा लांबल्याने जिल्ह्यात पाण्याची परिस्थिती मागील वर्षांपेक्षा चांगली आहे. पाणी आरक्षणासंदर्भात जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्ह्य़ातील असलेल्या नऊ मध्यम व ४२ लघु प्रकल्पांमध्ये सप्टेंबरअखेर किती जलसाठा झाला आहे, याबाबत आढावा घेण्यात आला. पाणी आरक्षणाची मागणी किती आहे, याचीही माहिती घेण्यात आली. त्यानुसार नऊ मध्यम प्रकल्पांपैकी चार आणि ४२ लघु प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पांमध्ये पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आले.
साक्री तालुक्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या पांझरा धरणात १८ दशलक्ष घनफूट, मालनगाव ६४.२०, जामखेडी ३.५० आणि बुराई प्रकल्पात १०.२८ दशलक्ष घनफूट या स्वरूपात पाणीसाठा आरक्षित करण्यात आला. उर्वरित पाच मध्यम प्रकल्पात आरक्षण करण्यात आलेले नाही. तर लघु प्रकल्प असलेल्या लामकानी प्रकल्पात १.७८ दशलक्ष घनफूट, वीरखेल १.८५, शेलबारी एक, खंडलाय २.०३, अंचाळे ३.०९, जामफळ ७.०७, देवभाने २.५७, काबऱ्या खडक १०.७३ , बुरडखे ९.५६ आणि अक्कलपाडा प्रकल्पात २३.६६ दशलक्ष घनफूट एवढा साठा आरक्षित करण्यात आला आहे. शिंदखेडा नगरपालिकेसाठी तापीवरील सुलवाडे लघु प्रकल्पातील ८० दशलक्ष घनफूट जलसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. या संदर्भात काही गावांची मागणी बाकी असल्यास त्यांच्याकडून ती आल्यावर परिपूर्ण अहवाल सादर करण्यास पाटबंधारे विभागाला सांगण्यात आले आहे. यंदा पावसाळ्याने जिल्ह्यास चांगलाच हात दिल्याने टंचाईच्या परिस्थितीवर मात करणे प्रशासनास शक्य झाले आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा झाल्याने या वेळी पाणी आरक्षण करणे सोयीचे जाणार असल्याने प्रशासनापुढील समस्या दूर झाली आहे.