जिल्हा परिषद अंतर्गत शिपाईपदाच्या ७४ जागांसाठी तब्बल १३ हजार उमेदवारांनी शनिवारी ४३ केंद्रांवर लेखी परीक्षा दिली.
परिचर पदासाठी दहावी उत्तीर्ण ही पात्रता असली तरी या पदासाठी मोठय़ा संख्येने उच्चशिक्षित उमेदवारही नशीब आजमावत आहेत. जि. प. अंतर्गत आस्थापनेवरील परिचर पदासाठी उमेदवारी अर्ज मागविले होते. ७४ जागांसाठी किमान दहावी उत्तीर्णची शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. मात्र, या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध होताच जिल्हाभरातून अर्जाचा ढीग पडला. तब्बल १३ हजार अर्ज आले. अर्जाची छाननी करून १२ हजार ७३८ पात्र उमेदवारांच्या शनिवारी ४३ परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. शिपाईपदाच्या परीक्षेसाठी पदवी व पदव्युत्तर, विविध व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवारही अर्ज दाखल करून नशीब आजमावत आहेत.