सोलापूर महापालिका परिवहन विभागातील १३४ रोजंदारी कामगारांची सेवेत कायम करण्याची मागणी सोलापूरच्या औद्योगिक न्यायालयाने फेटाळून लावली. या निकालामुळे अगोदरच आर्थिकदृष्टय़ा डबघाईला आलेल्या परिवहन विभागाला दिलासा मिळाला तर संबंधित रोजंदारी कामगारांना चपराक मिळाली आहे.
परिवहन विभागात रोजंदारीवर काम करणारे वाहनचालक, वाहक, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, हेल्पर, शिपाई आदी विविध संवर्गातील ३१९ कामगारांनी सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी सिटूप्रणीत लालबावटा महापालिका कामगार युनियनच्या माध्यमातून औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यानच्या काळात १८५ रोजंदारी कामगारांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे सेवेत कायम करण्यात आले. उर्वरित रोजंदारी कामगारांना सध्या मंजूर पदे उपलब्ध नसल्यामुळे सेवेत कायम करता येणार नाही, अशी भूमिका पालिका परिवहन विभागाने घेतली आहे. प्रशासनाच्या आस्थापना खर्चावर मर्यादा असल्यामुळे त्याचा विचार करता रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करणे अशक्य असल्याचे म्हणणे परिवहन विभागाने मांडले. याबाबतचा सविस्तर युक्तिवाद महापालिकेच्या सहायक विधान सल्लागार अॅड. शोभा पतंगे यांनी औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश एन. बी.बोस यांच्यासमोर केला. हा युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने रोजंदारी कामगारांची मागणी फेटाळली. कामगारांच्या वतीने अॅड. माशाळवाले तर सरकारतर्फे अॅड. रामदास वागज यांनी काम पाहिले.