जिल्ह्य़ातील १३५ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविण्यात येत असून गणेशोत्सवात पोलिसांचा शांतता व जातीय सलोखा राखण्यावर भर देण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक एस. जयकुमार यांनी म्हटले आहे.
कुठेही शांततेचा भंग होऊ नये, शांतता अबाधित रहावी व पर्यावरण संवर्धनासाठी बऱ्याच वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविला जातो. पोलीस दलाच्या या उपक्रमास यंदा जिल्ह्यातील १३५ गावांनी प्रतिसाद दिला आहे. यात पाचोरा तालुक्यातील सर्वाधिक गावे सहभागी झाली आहेत. जिल्ह्य़ातील गणेशोत्सवपर्व शांततेत पार पडावे म्हणून पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक तुकडी, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. उत्सवाच्या काळात कायदा धोक्यात आणण्याचा काही समाजकंटक प्रयत्न करतात. अशा समाजकंटकांवर विशेष नजर ठेवण्यात येत असून रावेर, अमळनेर, चोपडा, भुसावळ या संवेदनशील गावात पोलिसांचा वाढीव बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून मोठय़ा गणपती मंडळांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.