गेल्या काही महिन्यांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्यांचा ठाणे शहरातील नागरी वस्तीत वावर वाढू लागल्याने नागरिक भेदरलेले आहेत. याच पाश्र्वभूमीवर उद्यानालगत असलेल्या संरक्षक भिंतीची उंची सुमारे १४ ते १५ फूट करण्यात यावी, अशी सूचना सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारच्या सभेत केली. विशेष म्हणजे, वनविभागाने यापूर्वीच उद्यानालगत संरक्षक भिंती उभारण्याचे काम सुरू केले आहे. पण त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या भिंती सुमारे १२ फूट उंच उभारण्यात येत असल्या तरी, तेथून बिबळ्या उडी मारून नागरी वस्तीत येऊ शकतो, अशी धास्ती नागरिकांना आहे. त्यामुळेच या भिंतींची उंची आणखी तीन ते चार फूट वाढविण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागल्याचे दिसून येते.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच असलेल्या घोडबंदर परिसरातील गृहसंकुलांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बिबळ्याचा वावर वाढू लागला आहे. अनेक गृहसंकुलांच्या आवारातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बिबळ्या मुक्तपणे संचार करताना दिसून आला आहे. सध्या बिबळ्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिक दहशतीच्या सावटाखाली आहेत. बिबळ्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागानेही सापळे रचले आहेत, पण त्याला जेरबंद करण्यात अद्याप वनविभागाला यश आलेले नाही. बिबळ्याच्या दहशतीमुळे नागरिकांना एकटे-दुकटे बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. याच पाश्र्वभूमीवर घोडबंदर परिसरातील काही नगरसेवकांनी शुक्रवारच्या सर्वसाधरण सभेत बिबळ्याचा मुद्दा उपस्थित केला. बिबळ्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना अपयश येत असून या अधिकाऱ्यांकडून नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. तसेच नागरिकांना वनविभाग दाद देत नाही, असे आरोपही काही नगरसेवकांनी या वेळी केले. या संदर्भात, वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी तातडीने बैठक घेऊन उपाययोजना करण्यासंबंधी चर्चा करावी, अशी मागणीही नगरसेवकांनी केली. तसेच उद्यानालगत असलेल्या संरक्षक भिंतीची उंची सुमारे १४ ते १५ फूट करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केल्या. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्यासंबंधी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी या वेळी दिले.