ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी १४ एटीव्हीएम मशीन्स बसविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एटीव्हीएम’च्या अपुऱ्या संख्येमुळे ठाणे स्थानकातील तिकीट खिडक्यांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा दिसून येतात. याशिवाय उपलब्ध असलेली यंत्रे वारंवार नादुरुस्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे. हे लक्षात घेऊन मध्य रेल्वेने या स्थानकात आणखी १४ एटीव्हीएम यंत्रे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून असे झाल्यास स्थानकातील एकूण एटीव्हीएम्सची संख्या ३२ होणार आहे.
ठाणे स्थानकातून दिवसाला सुमारे साडेसहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या स्थानकातील तिकीट आणि पासच्या विक्रीतून सुमारे १३ कोटींहून अधिक महसूल प्रत्येक महिन्याला रेल्वेला मिळतो. मात्र सेवासुविधांच्या बाबतीत या स्थानकाला कायम दुय्यम वागणूक मिळते, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. तिकिटांसाठी मोठय़ा प्रमाणात एटीव्हीएम मशीनची आवश्यकता असताना ठाणे स्थानकात केवळ १८ एटीव्हीएम मशीन्स बसवण्यात आली आहेत. त्यापैकी अध्र्याहून अधिक यंत्रे सदैव बंद असतात, असा प्रवाशांचा अनुभव आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट खिडक्यांवरील भल्यामोठय़ा रांगांना सामोरे जावे लागते आहे. प्रवासाच्या वेळेपेक्षा अधिक वेळ प्रवाशांना तिकिटाच्या रांगांमध्ये काढावा लागतो. मध्य रेल्वेच्या इतर गर्दीच्या स्थानकांमध्येही असे चित्र पाहायला मिळते. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने एटीव्हीएमची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकांमध्ये सुमारे ३८२ एटीव्हीएम्स बसवण्यात आली होती. त्यापैकी ९८ मशीन्स बंद स्थितीत आहेत. ही सर्व एटीव्हीएम दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याशिवाय २८८ एटीव्हीएम मशीन्स पुढील दोन महिन्यांमध्ये स्थानकांमध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहेत, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
तात्काळ दुरुस्तीला प्राधान्य द्या!
मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांमध्ये एटीव्हीएम मशीन्सची संख्या वाढवण्याच्या रेल्वेच्या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत असले तरी नादुरुस्त यंत्रांच्या दुरुस्तीला तात्काळ प्राधान्य द्या, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे. एटीव्हीएम मशीन्समधील तिकिटांचे कागद संपल्यानंतर ते तात्काळ बंद पडते. त्यामुळे ही यंत्रणा दुसऱ्या दिवशी सुरू होते. पावसामुळे तसेच काचा फुटल्यामुळे नादुरुस्त झालेले एटीव्हीएम तात्काळ दुरुस्त करावीत, अन्यथा ती स्थानकातून काढून टाकावीत, अशी मागणीही जोर धरत आहे. बंद यंत्रांचा स्थानकात अडथळा निर्माण होत असतो. तो दूर करण्याचा प्रयत्न करण्याची गरज उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे नंदकुमार देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

येथेही एटीव्हीएम मशीन
ठाणे स्थानकासह जिल्ह्य़ातील अन्य स्थानकांमध्ये ४४ एटीव्हीएम मशीन बसविण्यात येणार असून त्यामध्ये कळवा- ४, मुंब्रा – ३, दिवा – २, कोपर – १, डोंबिवली – ८, ठाकुर्ली – १, कल्याण – १०, विठ्ठलवाडी – २, उल्हासनगर – ६ आणि अंबरनाथ – ६ अशी मशीनची संख्या असणार आहे.