नवी मुंबईकरांच्या दृष्टीने हे नवीन वर्ष भाग्यवान ठरणार असून २०१४ मध्ये कमीत कमी १४ छोटे-मोठे प्रकल्प मार्गी लागणार आहेत. पालिका मुख्यालय, सिडको प्रदर्शन केंद्र, दोन रुग्णालयांसारख्या मोठय़ा प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. खारघर येथे उच्च आणि मध्यम वर्गातील नागरिकांसाठी बांधण्यात येणाऱ्या १२०० घरांचा ताबा मिळण्याची शक्यता आहे. या स्थानिक प्रकल्पाबरोबरच जागतिक पातळीवरील बहुचर्चित प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची १८ हजार कोटी रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध होणार आहे.
नवी मुंबई या चाळिशी ओलांडलेल्या शहरातही आता काही आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय प्रकल्प येऊ घातले असून स्थानिक प्राधिकरणांच्या वतीने लक्षवेधी असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविले जात आहेत. त्यात नवी मुंबई या नावाला साजेसे असे पालिकेचे मुख्यालय उभारले जात असून पाच एकर जागेवर सुमारे २०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणारी ही आकर्षक इमारत १८ फेब्रुवारीला लोकार्पण होत आहे. शहराच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची आणि नागरिकांना दिलासा देणारी घटना आहे. देशात दिल्ली, चेन्नईसारखी महानगरे वगळता इतरत्र अस्तित्वात नसणारे भव्य प्रदर्शन केंद्र सिडकोच्या वतीने वाशी रेल्वे स्थानकाच्या बाहेर उभारले जात असून या प्रदर्शन केंद्राचे काम अंतिम टप्यात आले आहे. जून किंवा जुलैमध्ये या केंद्राचा लोकार्पण सोहळा होणार असून सिडकोने २८० कोटी रुपये या केंद्रावर खर्च केले आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर वाहनांची तसेच उद्योजकांच्या उत्पादनाचे प्रदर्शन नवी मुंबईकरांना पाहण्यास मिळणार आहे. सिडकोच्या वतीने खारघर सेक्टर ३६ येथे एक हजार २२४ घरांचे अत्याधुनिक आणि आलिशान असे गृहसंकुल उभारले जात आहे. या महिन्यात या घरांची सोडत निघणार असून वर्षअखेर भाग्यवान ग्राहकांना त्याचा प्रत्यक्ष ताबा दिला जाणार आहे. याशिवाय सिडको खारघर व घणसोली येथे अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांसाठी पाच हजार घरांची योजना राबविण्यास सुरुवात करणार आहे. पालिकेच्या वतीने ऐरोली व नेरुळ येथे १०० खाटांची दोन प्रथम संदर्भ रुग्णालये सुरू केली जाणार आहेत. वाशी येथे एकच रुग्णालय असल्याने रुग्णांचा खूप मोठा ताण या रुग्णालयावर पडत होता. याशिवाय बेलापूर येथे दुसरे ५० खाटांचे एक स्वतंत्र रुग्णालय उभारले जात आहे. ऐरोली येथील छोटय़ा नाटय़गृहाच्या कामाचा शुभारंभही होणार आहे. कोटय़वधी रुपये खर्चाची मलनि:सारण आणि पाण्याच्या वाहिन्या टाकण्याचे काम याच वर्षी पूर्ण होणार असल्याने मलनि:सारणाची पुढील ३० वर्षांची चिंता मिटणार असून २४ तास शहराला पाणी देण्याची घोषणा यावर्षी खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे. ही कामे पूर्ण झाल्याने अंर्तगत रस्त्याचे विघ्न दूर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पाण्याचा अपव्यय लक्षात घेता सर्वाना मीटर बसविण्याची पालिकेची यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. गोरगरिबांना मोफत मंगल कार्यालये उपलब्ध व्हावीत यासाठी ऐरोली, कोपरखैरणे, नेरुळ येथील मंगल कार्यालयांचा लोकार्पण सोहळाही यावर्षी होण्याची शक्यता आहे. याशिवाय ऐरोली सेक्टर १५ येथे बांधण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन यावर्षअखेर पूर्ण केले जाणार आहे. नवी मुंबई विमानतळ उभारणीला सहा गावांतील ग्रामस्थांचा विरोध असला तरी या प्रकल्पाची सुरुवात या वर्षी करण्याचा सिडकोचा निर्धार आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत या प्रकल्पाची जागतिक पातळीवर निविदा काढली जाणार असून या प्रकल्पाचा खर्च आता १८ हजार कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा साडेबारा टक्के भूखंड वितरण योजना आता दहा टक्केच शिल्लक राहिल्याने ती पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी डिसेंबरअखेर सुरू होणारी नवी मुंबई मेट्रो मात्र दोन-तीन वर्षांसाठी आता रखडली आहे.
*पालिका मुख्यालय
*सिडको प्रदर्शन केंद्र
*दोन रुग्णालये
*खारघर गृहप्रकल्प
*मलनि:सारण आणि  पाण्याच्या वाहिन्या टाकण्याचे काम
*ऐरोली, कोपरखैरणे, नेरुळ येथील मंगल कार्यालयांचा लोकार्पण सोहळा
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन