केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाला नागपूर विभागातून सरत्या वर्षांत १४०५ कोटी रुपयांचे उत्पादन शुल्क प्राप्त झाले असून सर्वाधिक उत्पादन शुल्क वेकोलितर्फे प्राप्त झाले आहे.
१ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ पर्यंत वेकोलिकडून ३४१ कोटी ७९ लाख, सनफ्लॅग आयर्न अ‍ॅण्ड स्टिल कंपनी लिमिटेडकडून ११० कोटी ३८ लाख, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडकडून १०८ कोटी २२ लाख, उत्तम गालवा मेटॅलिक लिमिटेडकडून १०० कोटी ७० लाख आणि स्टिल अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाकडून ७४ कोटी ६० लाख रुपये उत्पादन शुल्क प्राप्त झाले. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त कार्यालयाला मागितलेल्या माहितीनुसार ही माहिती प्राप्त झाली आहे.
वरील काळात उत्पादन शुल्क विभागाच्या संरक्षण शाखेने १४ ठिकाणी धाड टाकून ८ लाखाचा महसूल वसूल केला. कर्मचाऱ्यांकडून पदाचा दुरुपयोग करणे, शिस्तभंग केल्याचे एकही प्रकरण वरील काळात घडले नाही. मात्र, भ्रष्टाचार केल्याच्या कारणावरून दोन कर्मचाऱ्यांवर उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. उत्पादन शुल्क न भरल्याने विभागाने १५ संस्थांविरुद्ध उच्च न्यायालयात प्रकरण दाखल केले असून एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
एकूण १६ प्रकरणांपैकी दोन प्रकरणांचा निकाल लागला असून १४ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहितीही एका प्रश्नाच्या उत्तरात प्राप्त झाली. ठराविक मुदतीत उत्पादन शुल्क न भरणाऱ्या किती प्रतिष्ठानांना नोटीस बजावण्यात आल्या, याची माहिती केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या अपर आयुक्तांना मागावी, अशी सूचनाही माहिती मागणाऱ्याला देण्यात आली आहे.