पाटबंधारे विभागाचे ‘गोलमाल’ धोरण
गोदावरी डावा तट आणि उजवा तट कालव्याच्या दुरूस्तीवर कोटय़वधींचा संशयास्पद खर्च दाखविणाऱ्या नाशिक पाटबंधारे विभागाने आवर्तन सोडतानाही ‘प्रवाही तूट’च्या नावाखाली गोलमाल करण्याचे धोरण अनुसरल्याचे दिसत आहे. या संदर्भात माहितीच्या अधिकारात उत्तर देताना नदीत १५ टक्के तर कालव्यात प्रवाही तूट ६३ टक्के असल्याचा अजब शोध या विभागाने लावला आहे. दुष्काळी परिस्थितीत पाण्याच्या काटेकोर नियोजनाची गरज असताना या विभागाने दिलेल्या माहितीवरून दोन्ही कालव्यातून अकरा महिन्यात थोडे थोडके नव्हे तर, तब्बल १६ हजार ४६५ क्युसेक्स (१४२२ दशलक्ष घनफूट) पाणी ‘वहन व्यय’ म्हणजे निव्वळ वाया गेल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या निर्माण झालेले टंचाईचे भीषण संकट लक्षात घेतल्यास शेकडो गावांची तहान त्या पाण्यातून सहजपणे भागविणे शक्य झाले असते. परंतु, नियोजनाचा अभाव व ठिकठिकाणी होणारी पाणी चोरी

यामुळे दरवर्षी या पद्धतीने पाण्याचा सर्रास अपव्यय होत असल्याचे विदारक चित्र आहे.
गोदावरी डावा तट आणि उजवा तट कालव्यातून नांदूरमध्यमेश्वरच्या खालील भागात शेती व पाणी पुरवठा योजनांसाठी पाणी दिले जाते. हे आवर्तन सोडताना पाण्याचे कसे व किती नुकसान होते, ही बाब पाटबंधारे विभागाच्या माहितीवरून उघड झाली आहे. १९१६ मध्ये कार्यरत झालेले हे कालवे बरेच जुने असून त्यांच्या दुरूस्तीसाठी कोटय़वधींचा खर्च केला गेला असला तरी त्यातून होणारी पाण्याची गळती रोखण्यात यश आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. १४ फेब्रुवारी २०१२ ते १७ जानेवारी २९१३ पर्यंतच्या रब्बी आवर्तनात दारणा धरण समुहातून ४९,१४० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. त्यातील ३४ हजार ३२५ क्युसेक्स पाणी नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात पोहोचले. म्हणजेच ५,८१५ क्युसेक्स पाणी कोणताही वापर न होता वाहून गेले.पोहोचलेल्या पाण्यापैकी २२८७ दशलक्ष घनफूट (२६,४३२ क्युसेक्स) पाणी पुढे दोन्ही कालव्यांमध्ये सोडण्यात आले. त्यातील प्रत्यक्षात केवळ ८६४ दशलक्ष घनफूटचा वापर झाला तर १४२२ दशलक्ष घनफूट पाणी वाया गेले. म्हणजे, जितके पाणी सोडण्यात आले, त्यातील निम्म्याहून कमी पाण्याचा प्रत्यक्षात उपयोग झाला आणि निम्म्याहून अधिक पाणी निव्वळ वाया गेल्याचे या विभागाची आकडेवारी स्पष्ट करते.
धरणातून नदीपात्र व कालव्यात पाणी सोडल्यानंतर प्रवाह मार्गात पाण्याचे होणारे नुकसान म्हणजे ‘वहन व्यय’ होय. डाव्या कालव्याच्या ७० किलोमीटर प्रवासात वहन गळती ५९ टक्के तर उजव्या कालव्यात ६३

टक्के इतकी आहे. कालव्यांचे वय जवळपास शंभर वर्षांचे असल्याने कालव्याची वहन क्षमता कमी झाल्याचा मुद्दा पाटबंधारे विभागाकडून मांडला जातो. परंतु, याच विभागाने दिलेल्या माहितीनुसार उजव्या कालव्याची वहन क्षमता ६०० क्युसेक्स आहे.
विहित कालावधीत या कालव्यातून १७,५०७ क्युसेक्स पाणी वाहिले. याचाच अर्थ कालवा आपल्या क्षमतेच्या ९० टक्के प्रमाणात चालला. जर कालवा इतका जुना आहे, त्याची वहन क्षमता घटली आहे तर त्याने सरासरी ९० टक्के पाण्याचे वहन कसे केले, हा संशोधनाचा विषय असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. डाव्या कालव्याचीही ही स्थिती आहे. प्रवाही तुटीच्या नावाखाली पाटबंधारे विभाग गोलमाल करत असल्याचा संशय काळे यांनी व्यक्त केला आहे. या विभागाने दिलेल्या माहितीचा विचार करता नदी व कालव्यांद्वारे पाणी सोडताना लक्षणिय प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून येते.