शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) नेत्ररोग विभागातर्फे २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबपर्यंत नेत्रदान पंधरवडा राबविण्यात आला. या अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी आयोजित नेत्र तपासणी शिबिरात १५०० नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ९ नागरिकांनी नेत्रदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय करून दिला.
दीड हजारांवर नागरिकांमध्ये १३० मोतीबिंदू, १५ काचबिंदू, १७ बुब्बुळ अंधत्व व २५ मुलांमध्ये अंधत्व व डोळ्यांचा तिरपेपणा आढळून आला. तापसणीनंतर नागरिकांना चष्म्याचे क्रमांक वितरित करण्यात आले. मोतीबिंदू आढळून आलेल्या नागरिकांवर मेडिकलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बुब्बुळ अंधत्व आढळून आलेल्यांवर बुब्बुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या पंधरवडय़ात एकूण नऊ जणांनी नेत्रदान केले. त्यांच्या नेत्रदानामुळे नऊ जणांचे जीवन प्रकाशमान होणार आहे. शहरात आयोजित विविध शिबिरात विभागप्रमुख डॉ. अशोक मदान, सहयोगी प्राध्यापक डॉ. दिलीप कुमरे, डॉ. मोना देशमुख, डॉ. कविता धाबर्डे, डॉ. स्नेहल बोडे, डॉ. निलेश गद्देवार, डॉ. राहुल डगवार, डॉ. जयश्री इखार यांनी नागरिकांची तपासणी करून त्यांना योग्य तो सल्ला दिला. या शिबिरात पदव्युत्तर विद्यार्थ्यांनीही आपले योगदान दिले.