महावितरणच्या पायाभूत सुविधा व कार्यपद्धतीत अमूलाग्र बदल घडवून आणण्याची प्रक्रिया सुरू असून, नाशिक विभागासाठी टप्प्याटप्प्याने १५० कोटींची गुंतवणूक महावितरणकडून होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे नवनिर्वाचित प्रकल्प संचालक पि. यू. शिंदे यांनी दिली.
याआधी नाशिक विभागात मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होतो. नाशिकच्या प्रश्नांची आपणास जाणीव आहे. असल्यामुळे तत्परतेने नाशिकच्या महावितरण सुविधांविषयी दखल घेण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. शिंदे यांची नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (निमा) शिष्टमंडळाने कंपनीचे मुख्यालय ‘प्रकाशगड’ येथे भेट घेतली. त्यावेळी शिंदे यांनी शिष्टमंडळास ही ग्वाही दिली. ‘निमा’चे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, ऊर्जा समिती अध्यक्ष मिलिंद राजपूत, अ‍ॅड. सिद्धार्थ सोनी आदिंनी त्यांचे अभिनंदन केले. नाशिक महापालिका हद्दीतील तसेच ग्रामीण विभागातील मुख्यत: गोंदे येथील औद्योगिक भूसंपादन प्रक्रिया कार्यान्वित असल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर वीज वितरण कंपनीच्या पायाभूत सुविधांची गरज भासणार असून, त्यासाठी आतापासूनच प्रयत्न करण्याची गरज राजपूत यांनी व्यक्त केली. पुढील वर्षी येऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी मोठय़ा प्रमाणावर तात्पुरत्या तसेच कायमस्वरुपी पायाभूत सुविधा आवश्यक असल्याचे मत ब्राह्मणकर यांनी व्यक्त केले.