इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांच्या गेले महिनाभर सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे सुमारे १५०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. वस्त्रनगरीच्या आर्थिक नाडय़ा आवळल्या गेल्याच आहेत. शिवाय, या नगरीशी जोडले गेलेले उत्तर-दक्षिण भारत व्यापारी कनेक्शन थंडावले आहे. उत्तर भारतातील कापड व्यापारावर तर दक्षिण भारतातील सूत व्यापाऱ्यावर परिणाम झाला असून त्यांनाही दररोज कोटय़वधी रुपयांची झळ बसत आहे. देशातील सूती कापडाची प्रमुख बाजारपेठ असलेल्या इचलकरंजीतील कामगारांचे आंदोलन कधी एकदा संपते याकडे उत्तर-दक्षिण भारतातील वस्त्रजगताचे लक्ष वेधले आहे.
 जगभरात सिंथेटिक कापडाची बाजारपेठ वाढू लागली आहे. भारतात अजूनही सुती कापडाची (कॉटन) बाजारपेठ ६० टक्के इतकी आहे. यामध्ये इचलकरंजीतील कापड बाजारपेठेचा अग्रक्रमाने उल्लेख केला जातो. अन्य बाजारपेठेंच्या तुलनेत येथे मिळणारे कापड प्रतिमीटर १ रुपया जादा असते. पण कापडाची गुणवत्ता चांगली असल्याने इचलकरंजीतून कापड खरेदी करण्याकडे व्यापाऱ्यांचा कल आहे. विशेषत ‘धोती’मध्ये तर इचलकरंजीचा हात धरणारी बाजारपेठ देशात अन्यत्र नाही. इचलकरंजीत निर्माण झालेले कापड प्रोसेसिंगसाठी राजस्थानात व तेथून देशभरात विक्रीसाठी पाठविले जाते. तर इचलकरंजीत कापड बनविण्यासाठी लागणारा धागा हा प्रामुख्याने दक्षिणेकडील राज्यातून येत असतो. अशा प्रकारे इचलकरंजीच्या कापडनिर्मितीचे कनेक्शन हे उत्तर-दक्षिण भारताशी जोडले गेलेले आहे. दररोज कोटय़वधी रुपयांची उलाढाल या प्रांताशी इचलकरंजीतून होत असते.     
इचलकरंजी शहरात साध्या यंत्रमागाची संख्या सुमारे सव्वा लाख आहे. त्यावर प्रत्येक मागास दररोज ८० मीटर कापड उत्पादन होते. याचा अर्थ वस्त्रनगरीतील दररोज सुमारे १ कोटी मीटर कापड उत्पादन होते. उत्पादित कापड हे १५ रुपयांपासून ४० रुपये मीटरर्प्यत विकले जाते. सरासरी २५ रुपये मीटर कापडविक्री होते, असा हिशोब केल्यास २५ कोटी रुपयांच्या कापडाची निर्मिती येथे होत असते. हा सर्व व्यवहार गेल्या महिन्याभरापासून ठप्प झाला आहे. याशिवाय शहरात ऑटो व शटरलेस लूमवर दररोज ३५ लाख मीटर कापड उत्पादित होत असते.    
साध्या मागावर १ कोटी मीटर कापडाची निर्मिती होत असली तरी त्यासाठी दररोज १४ हजार पोती (बाचकी) सूत लागत असते. प्रत्येक मीटरसाठी सव्वाशे ग्रॅम सुताची गरज असते. या हिशोबाने दररोज १५ ते २० कोटी रुपयांचे सूत इचलकरंजीत येत असते. दक्षिण भारतातून होणारी ही आवक आता ठप्प झाली असून तेथील व्यापारीही चिंतेत सापडला आहे.     
इचलकरंजीत उत्पादित होणाऱ्या कापडापैकी बहुतांशी कापड पाली व बालोत्रा या राजस्थानातील शहरामध्ये प्रोसेसिंगसाठी पाठविले जाते. तर उर्वरित कापड इचलकरंजीत प्रोसेससाठी पाठविले जाते. दररोज ८ कोटी रुपयांचे कापड प्रोसेसिंगसाठी पाठविले जाते. हाही व्यवहार गेल्या महिन्यापासून लक्षणीयरीत्या खालावला आहे. याशिवाय कापड विणण्यापूर्वी सुतावर सायझिंगची प्रक्रिया केली जाते. यासाठी इचलकरंजीत १६० सायझिंगवर ही प्रक्रिया केली जाते. तेथेही दररोज १ कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल होत असते. यालाही आता लगाम बसला आहे.     यंत्रमाग कामगारांना दर महिना १० हजार रुपये वेतन मिळावे, या मागणीसाठी यंत्रमाग कामगार कृती समितीच्या वतीने आंदोलन सुरू आहे. यामुळे कापडनिर्मितीतील २५ कोटी, सूत व्यापाऱ्यांचे १५ कोटी, प्रोसेस उद्योगातील ८ कोटी व सायझिंग क्षेत्रातील १ कोटी अशी साधारणत: दररोज ५० कोटींची उलाढाल थंडावली आहे. महिन्याभरात १५०० कोटी रुपयांचे व्यवहार थंडावले आहेत. शिवाय बँकेपासून ते दैनंदिन वस्तू लागणाऱ्या सर्व प्रकारच्या दुकानांचे व्यवहारही मंदावले आहेत. वस्त्रनगरीच्या आर्थिक नाडय़ा तर आवळल्या गेल्याच आहेत. शिवाय उत्तर व दक्षिण भारताशी असलेले आर्थिक कनेक्शनही बंद पडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.