दुर्मीळ रक्तगटाचा रुग्ण असूनही रक्ताची व्यवस्था झाली नसताना बाळंतपणाची शस्त्रक्रिया केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याने नालासोपारा येथील ताटे रुग्णालयाचे डॉ. राजेश ताटे यांना राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचाने १६ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. वैद्यकीय निष्काळजीपणाचा ठपका मंचाने डॉक्टरांवर ठेवला आहे. या महिलेच्या कुटुंबीयांना तब्बल १८ वर्षे न्यायालयीन लढाई केल्यानंतर न्याय मिळाला आहे.
मयुरी सुश्रूत ब्रह्मभट्ट यांना बाळंतपणासाठी २० सप्टेंबर १९९५ रोजी नालासोपारा येथील ताटे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा ‘ए आर एच निगेटिव्ह’ हा दुर्मीळ रक्तगट होता. त्यांच्यावर बाळंतपणाची शस्त्रक्रिया केल्यावर मुलगी झाली, पण रक्तस्राव होऊ लागला. डॉक्टरांनी रुग्णाच्या कुटुंबीयांना रक्ताची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यानंतर चार बाटल्या रक्त आणले गेले व काही देणगीदारही आले. पण त्यात काही कारणांमुळे वेळ गेला आणि वादविवादही झाले. मयुरी यांची तब्येत खालावत चालल्याने सुश्रूत यांचे स्नेही डॉ. राम बारोट यांनी बोरिवली येथील भगवती रुग्णालयात त्यांना हलविण्याची व्यवस्था केली. मयुरी यांच्या समवेत डॉ. ताटेही होते. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे भगवती रुग्णालयातील डॉक्टरांनी जाहीर केले. त्यांचा मृत्यू शस्त्रक्रियेनंतरच्या अतिरक्तस्रावामुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले.
त्यामुळे सुश्रूत ब्रह्मभट्ट आणि कृपाली व हेतल या मुलींच्या वतीने अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे अर्ज करून नुकसानभरपाईची मागणी केली. १९९७ मधील या अर्जावर तब्बल १८ वर्षांनी निकाल आला असून डॉ. ताटे यांना वैद्यकीय निष्काळजीपणासाठी दोषी ठरविण्यात आले आहे. मयुरी यांचा रक्तगट दुर्मीळ असून ऐनवेळी रक्ताची गरज भासू शकते. तेव्हा त्यांना बाळंतपणासाठी अन्यत्र दाखल करण्याचा सल्ला आपण आधीच दिला होता. पण आपल्याला हेच रुग्णालय सोयीचे आहे व रक्ताची व्यवस्था आपण करू, असे कुटुबीयांनी सांगितले होते. रक्त मिळविताना विलंब झाला, असा बचाव डॉक्टरांच्या वतीने करण्यात आला. परंतु मंचाने तो फेटाळून लावला. मयुरी यांचा रक्तगट आणि पहिल्या बाळंतपणाच्या वेळीही शस्त्रक्रिया करावी लागली, याची कल्पना डॉ. ताटे यांना आधीपासून होती. शस्त्रक्रियेची तातडी नव्हती आणि तरी रक्ताची व्यवस्था होण्याआधी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतल्याने डॉक्टरांना दोषी ठरवून नुकसानभरपाई देण्याचे आदेश मंचाने दिले.