अनधिकृतपणे वीज जोडणी घेणाऱ्या गणेश मंडळांवर लक्ष ठेवण्यासाठी महावितरणने ‘दामिनी’ पथक स्थापन केले आहे. असे मंडळ आढळल्यास त्यांना अधिकृतपणे वीज जोडणी घेण्यास प्रवृत्त करण्यात येत असून आतापर्यंत शहरातील १७० पेक्षा अधिक मंडळांनी अधिकृतपणे वीज जोडणी घेतली आहे. दामिनी पथकाने ३५ पेक्षा अधिक मंडळांची तपासणी केली असून गणेशोत्सव संपेपर्यंत ही तपासणी सुरूच राहणार आहे.
गणेशोत्सव सुरू होण्याआधीच महावितरणने अधिकृत वीज पुरवठा घेण्याकरिता मंडळांना आवाहन केले होते. परंतु काही मंडळांनी वीज पुरवठा घेण्यासाठी परवानगी काढण्याऐवजी अनधिकृतपणे विजेचा वापर सुरू केल्याच्या तक्रारी महावितरणकडे गेल्या. अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्या मंडळांमुळे परिसरातील वसाहतींनी कमी दाबाने वीज पुरवठा होणे, अचानक वीज गायब होणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना नागरिकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते जुमानत नसल्याचे दिसत आहे. अशा मंडळांचा शोध आणि देखरेख करण्याचे काम महावितरणचे दामिनी पथक करीत आहे. आतापर्यंत दामिनी पथकान ३५ पेक्षा अधिक मंडळांच्या वीज जोडणीची तपासणी केली आहे. ज्या मंडळांनी अनधिकृतरित्या वीज जोडणी घेतली होती. त्यांना अधिकृतपणे वीज जोडणी घेण्यास भाग पाडले आहे. गणेशोत्सवापर्यंत ही कार्यवाही अशीच सुरू राहणार आहे. काही मंडळांनी घरांमधूनच वीज घेतल्याचे महावितरणच्या तपासणीत आढळून आले आहे.
गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव, दीपावली, नाताळ असे सण आणि उत्सव लागोपाठ येणार आहेत. या सर्व उत्सवांमध्ये विजेचा मोठय़ा प्रमाणावर वापर ठरलेला असतो. त्यामुळेच महावितरणकडून सण आणि उत्सवाकरिता वाजवी दराने म्हणजे ३.२७ पैसे प्रती युनिट या दराने वीज पुरवटा केला जातो. हा दर घरगुती दरापेक्षाही फार कमी आहे. तरीही अनेक मंडळांकडून अधिकृतरित्या वीज जोडणी घेणे टाळले जाते. गणेशोत्सवाकरिता वीज मिळण्यसाठी एक हजार रुपये अनामत म्हणून महावितरणकडे जमा करावी लागते. गणेशोत्सव संपल्यानंतर अर्जदारास ही रक्कम परत मिळते.
आतापर्यंत शहरातील १७० पेक्षा अधिक गणेश मंडळांनी महावितरणकडून वीज पुरवठा घेतला आहे. गणेश मंडळांनी अजूनही अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.