मनसे टोलविरोधी आंदोलनात जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे १७८ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आंदोलनकर्त्यांनी धानोरा-िहगोली, तसेच माहूर-औरंगाबाद या दोन बसवर दगडफेक केली. यात बसच्या काचा फुटल्या. कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी ठिकठिकाणी १७८ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. बसची तोडफोड करणाऱ्या चौघांशिवाय इतरांना नंतर सोडून दिले. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, असे पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी सांगितले. सेनगाव तालुक्यात िहगोली आगाराची धानोरा-िहगोली या बसवर (एमएच २० बीएल १६०) दगडफेक झाली. मात्र, या प्रकरणी सेनगाव पोलिसांत नोंद झाली नव्हती.
िहगोलीपासून जवळच न्यू बंजारा हॉटेलसमोर आंदोलनकर्त्यांनी माहूर आगाराच्या माहूर-औरंगाबाद बसवर (एमएच १४ बीटी १५६९) दगडफेक केली. बसचालक नारायण वड्डे यांच्या तक्रारीवरून िहगोली ग्रामीण पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. संतोष नामदेव खंदारे, सचिन जाधव, पांडुरंग झाडे व गजानन बांगर या चौघांना पोलिसांनी अटक केली. जिल्हाध्यक्ष बंडू कुटे यांच्या नेतृत्वाखाली बळसोंड-अकोला बायपासवर आंदोलनाची तयारी करीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सर्वत्र आंदोलन शांततेत पार पडले. दोन बसची तोडफोड वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.