येथून जवळच असलेल्या सायने शिवारातील महापालिकेच्या घरकुल प्रकल्पाच्या ठिकाणी तब्बल १८ बांग्लादेशीय नागरिकांना मंगळवारी मध्यरात्री नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखा व मालेगाव तालुका पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पकडण्यात आले. या सर्वावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
सायने बुद्रूक शिवारात महापालिकेतर्फे शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी निर्मुलन कार्यक्रमांतर्ग्रत घरकुल योजनेचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणीच संबंधित ठेकेदाराच्या मजुरांचे वास्तव्य आहे. याच ठिकाणी काही बांग्लादेशीय नागरिकांचे वास्तव्य असल्याची गुप्त माहिती नाशिकच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा व तालुका पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला असता अठरा बांग्लादेशीय नागरिक आढळून आले. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा ‘व्हिसा’ वा ‘पासपोर्ट’ आढळून आला नाही. मात्र त्यांच्या ताब्यात भ्रमणध्वनी व बांग्लादेशातील सीमकार्ड आढळून आले असून ते जप्त करण्यात आले आहे. हे लोक येथे किती दिवसांपासून वास्तव्यास होते याचा अद्याप उलगडा झाला नाही. मात्र घरकुल प्रकल्पावर मजूर म्हणून ते कामाला असावेत असा संशय आहे. अन्य स्थानिक मजूरांच्या तुलनेत हे बांग्लादेशीय नागरिक स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने ठेकेदाराने कोणतीही खातरजमा न करता प्रकल्पाच्या कामावर त्यांना ठेवले असण्याचा कयास व्यक्त केला जात आहे.