बुधवारी उपनगर पोलीस ठाण्यात लष्करी जवानांनी चढविलेल्या हल्ल्यानंतर गुरुवारचा दिवस उपनगर पोलीस ठाण्यासाठी नेहमीप्रमाणे नियमित कामकाजाचा ठरला. दैनंदिन कामकाजात त्या घटनेचा कुठलाही मागमुस दिसला नाही. ‘खेळ रोजचा नवा..’ या वृत्तीने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परस्परांना संक्रांतीच्या शुभेच्छा देत कामकाजास सुरूवात केली. दरम्यान, या प्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्या १८ संशयित जवानांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
शहरातील तोफखाना केंद्रातील अधिकाऱ्याविरुध्द सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यामुळे संतप्त झालेल्या केंद्रातील १०० ते १२५ जवानांनी बुधवारी उपनगर पोलीस ठाण्यावर थेट हल्ला चढविला होता. पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मारहाण करत कार्यालयीन वस्तुंसह वाहनांची नासधूस केली. या हल्ल्यात आणि मारहाणीत १२ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरीत काही जखमींना रुग्णालयातून सोडण्यात आले. या हल्ल्यात पोलीस ठाण्यातील जवळपास सर्व साहित्याची नासधुस झाली. एकूण सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. पोलीस ठाण्याची अवस्था बिकट झाली होती. यामुळे गुरुवारी कामकाज होईल की नाही याबद्दल साशंकता होती.
परंतु, आदल्या दिवशी रात्रीपासून उपनगर पोलीस ठाणे पूर्ववत करण्याच्या दृष्टीने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आवश्यक पाऊले उचलण्यास सुरूवात केली. या धक्यातून सावरलेले कर्मचारी आणि अधिकारी नियोजीत वेळेत कामावर हजर झाले. आदल्या दिवशीच्या घटनेचा कुठलाही मागमुस राहणार नाही यादृष्टीने संपूर्ण भागाची स्वच्छता करण्यात आली. नव्याने कुंडय़ा आणण्यात आल्या. कामकाज नियमीत होण्यासाठी  संगणक, वायरलेस यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक साहित्य, कार्यालयीन स्टेशनरी, लाकडी साहित्य यासह आवश्यक साहित्य नव्याने खरेदी करण्यात आले. काही साहित्य इतर पोलीस ठाण्यातून मागवत कामाला सुरूवात झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नम्रता देसाई यांनी सांगितले. या प्रकरणी आतापर्यंत १८ संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यात आशिष बागूल, विशांत येशरेड्डी, जीस जॉर्ज, मोनज मोहनलाल केशवाणी, अविनाश कुमार, अमित साहू, आर्चित तिवारी, संजय जोशी, मणीचैतन्य राहू, राहुल दास, महेंद्र सिंग, पारस बसेरा, नेलीबर, रविंद्र झा, रणबीरसिंग कुलदेव, राजनश्री शर्मा, कुवलदीप गुरूमेखसिंग, रज्जत राकेश, कुमार यादव, रणबीरकुमार, वैभव शर्मा यांचा समावेश आहे. या संशयित जवानांना गुरुवारी नाशिकरोडच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संबंधितांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या बाबतची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.