रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रयत्न करीत असून याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून यंदाच्या आर्थिक वर्षांत मध्य रेल्वेवरील सात स्थानकांवर तब्बल १९ सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. याबाबतची घोषणा यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात झाल्यामुळे हे काम प्राधान्याने पूर्ण केले जाणार आहे. सध्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर आठ सरकते जिने बसवण्यात आले आहेत. हे १९ नवीन सरकते जिने बसवल्यानंतर दादर आणि ठाणे या दोन स्थानकांतील सरकत्या जिन्यांची संख्या सहावर पोहोचणार आहे.
रेल्वे अपघातांबाबत सर्वच लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाल्यांतर मध्य रेल्वेनेही या अपघातांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या. दोन स्थानकांदरम्यान रुळांच्या बाजूने संरक्षक भिंती बांधण्यापासून ते स्थानकातील दोन रुळांमध्ये कुंपण बसवण्यापर्यंत अनेक उपाय मध्य रेल्वेने केले. मात्र ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासी यांना जिने चढण्यासाठी होणाऱ्या त्रासाचा विचार करून मध्य रेल्वेने २०१३पासून सरकते जिने बसवण्यास सुरुवात केली. याबाबतची घोषणा २०१२च्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यानुसार गेल्या वर्षी जून महिन्यात पहिला सरकता जिना ठाणे स्थानकात बसवण्यात आला.
यंदाच्या अर्थसंकल्पात मध्य रेल्वेसाठी प्रस्तावित ४५ सरकत्या जिन्यांपैकी १९ जिन्यांबाबतची तरतूद करण्यात आली आहे. सध्या मध्य रेल्वेवर ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि दादर या स्थानकांत प्रत्येकी दोन सरकते जिने बसवण्यात आले आहेत. त्याशिवाय विक्रोळी येथेही सरकता जिना बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यंदाच्या वर्षांत मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, घाटकोपर, भांडुप, कल्याण आणि लोणावळा या सात स्थानकांवर सरकते जिने बसवणार आहे. त्यासाठी अंदाजे १९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनसचा वाढता वापर लक्षात घेऊन या स्थानकावर मध्य रेल्वेतर्फे चार सरकते जिने बसवले जातील. तर दादर आणि ठाणे या स्थानकांमध्येही चार जिने बसवण्यात येणार आहेत. मेट्रोवन प्रकल्प सुरू झाल्यापासून घाटकोपर स्थानकावरील वाढलेला ताण लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वे या स्थानकात दोन सरकते जिने बसवणार आहे. तर कल्याण आणि लोणावळा स्थानकांतही प्रत्येकी दोन सरकते जिने बसवले जातील. त्याशिवाय भांडुप स्थानकात एक सरकता जिना प्रवाशांना मिळणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी दिली.
येत्या आर्थिक वर्षांत हे काम पूर्ण झाल्यावर दादर आणि ठाणे या दोन मुख्य स्थानकांमध्ये एकूण सहा सरकते जिने प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत. एका सरकत्या जिन्यावरून एका मिनिटाला साधारण १२०० लोक जाऊ शकतात. त्यामुळे याचा फायदा प्रवाशांना निश्चितच होईल. भविष्यात मध्य रेल्वेवरील आणखी काही स्थानकांवर हे जिने बसविण्यात येणार असल्याचेही सिंग यांनी स्पष्ट केले.