कापूस व्यापाऱ्याच्या मुनीमाकडील १९ लाख रुपये रोकड असलेली बॅग भरदिवसा पळविण्यात आली. गुरुवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात सायळा रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून, गाडीवर हल्ला करून चोरटय़ाने मुनीमावर चाकूचा वार केला.
लिमला येथे मारोती जििनग प्रेसिंग युनिट चालते. सध्या जििनगवर मध्य प्रदेशातील व्यापारी सतीश शर्मा कापूस खरेदी करतात. दररोज लाखोची कापूस खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांना रक्कम देण्यासाठी त्यांनी गुरुवारी मुनीम आलोक शर्मा यांना परभणीस पाठवले होते. त्यांच्यासोबत चालक कमलेश गुप्ता होते. सुरुवातीला शर्मा यांनी हैदराबाद बँकेच्या मुख्य शाखेतून १० लाख रुपये काढले. नवा मोंढय़ात एका व्यापाऱ्याला यातून ६ लाख ८ हजार रुपये दिले. तेथून निघून वसमत रस्त्यावरील अॅक्सीस बँकेत गेले. या बँकेतून त्यांनी १५ लाख रुपये काढले. दोन बॅगमध्ये १८ लाख ९२ हजारांची रोख रक्कम भरली व लिमल्याला जििनगकडे जाण्यासाठी चारचाकीतून विद्यापीठ परिसरातून निघाले.
दुपारी सव्वातीनच्या सुमारास महादेव मंदिराजवळ समोरून लाल पल्सर मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी मोटारसायकल रस्त्यावर आडवी लावून शर्मा यांची गाडी थांबवली. एक चोरटा चालकाच्या बाजूने, तर इतर दोघे मुनीमाच्या बाजूने गेले. चालकाला चाकूचा धाक दाखवून गाडीखाली उतरविले. चालक घाबरून परभणीच्या दिशेने पळाला, तर शर्मा यांच्या हातावर चाकूचा वार करून गाडीच्या काचा फोडल्या व गाडीतील १८ लाख ९२ हजार असलेल्या दोन्ही बॅगा घेऊन चोरटे पसार झाले.
चोरटय़ाच्या मारहाणीत शर्मा यांच्या हाताला मार लागला. चोरटय़ांची मोटरसायकल विनाक्रमांकाची होती. घटना कळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, नवा मोंढा पोलिसांनी चोरटय़ाचा शोध सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. यापूर्वीही हैदराबाद बँकेच्या मुख्य शाखेसमोरून एका जिनिंग मालकाची २७ लाखांची बॅग चोरीस गेली होती. या चोरीचा तपास अजूनही लागू शकला नाही. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.