सिंहस्थ कुंभमेळा नियोजन
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनाची कसरत प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. त्या अनुषंगाने सिंहस्थ काळात शहरात दाखल होणारी वाहने बाहेरील वेगवेगळ्या १९ ठिकाणी थांबविण्यात येणार आहेत. अंतर्गत वाहतुकीवर विपरीत परिणाम होऊ नये, याकरिता एसटी महामंडळाने या वाहनतळासाठी एकूण १९ ठिकाणे निश्चित केली आहेत. या व्यतिरिक्त प्रवाशांना मूलभूत सोयी-सुविधा, बस स्थानकाचे नूतनीकरण, नवे बांधकाम तसेच अन्य काही कारणांसाठी राज्य शासनाकडून ११.२५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. परंतु, आचारसंहिता व अन्य काही कारणांस्तव तो पदरात पडू न शकल्याने महामंडळाने पदरमोड करीत कामांना सुरुवात केली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा नाशिक व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होत असतो. या दोन्ही ठिकाणी पर्वणीच्या दिवशी शाही स्नानासाठी देशभरातील व परदेशातून लाखो भाविक येत असतात. अक्षरश: लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांमुळे अंतर्गत वाहतूक सुरळीत राखणे प्रशासनासमोर आव्हान असते. या पाश्र्वभूमीवर अंतर्गत वाहतूक व्यवस्थेला कुठलाही अडथळा येऊ नये तसेच भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळ नियोजन करत आहे. पहिल्या टप्प्यात बाहेरगावाहून येणारी वाहने थेट त्र्यंबक किंवा नाशिकमध्ये दाखल होऊ नये तसेच यामुळे गोंधळसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शहरात तसेच शहराबाहेर १९ वाहनतळांची निश्चिती करण्यात आली आहे. बाह्य़ वाहनतळात नाशिक-पुणे रस्त्यावरील मोहदरी, औरंगाबाद-नाशिक रस्त्यावरील ओढा, मालेगाव-नाशिक रस्त्यावरील आडगांव ट्रक टर्मिनल, दिंडोरी-नाशिक रस्त्यावरील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, पेठ रस्त्यावर हॉटेल राऊच्या पुढील कमान, गंगापूर रस्त्यावर दुगांव, सातपूर रस्त्यावर सातपूर अंबड लिंक रोड येथील एसटी महामंडळाची जागा, मुंबई-नाशिक रस्त्यावरील विल्होळी येथील जैन मंदिराची जागा, नाशिक-त्र्यंबकसाठी खंबाळे, घोटी ते त्र्यंबकेश्वरसाठी पहिणे आणि जव्हार ते त्र्यंबकेश्वरसाठी अंबोली या ठिकाणांचा समावेश आहे. तसेच उपरोक्त मार्गावरील वाहनतळात नाशिकरोड, निलगिरी बाग या ठिकाणी ४, गरज पडल्यास मेरी येथील कॅनालजवळील जागेवर, सोमेश्वर, महामार्ग बस स्थानक तसेच गरज भासल्यास राजीवनगर येथील वाळूच्या ठिय्याजवळ, अंजनेरी येथील तुपादेवी या ठिकाणी दोन आणि सापगांव येथे वाहनतळ निश्चित करण्यात आले आहे.
उपरोक्त ठिकाणी त्या त्या मार्गावरून येणारी वाहतूक अडविली जाणार आहे. त्यात बाहेरगावहून येणाऱ्या बस, खासगी गाडय़ा तसेच इतर काही वाहने वाहनतळावर थांबविली जातील. त्या ठिकाणाहून राज्य परिवहन मंडळाकडून त्र्यंबकच्या अलीकडे पाच ते सात किलोमीटर अंतरावर एसटी बसेस थांबविण्यात येतील. आगामी काळात वाहनतळाची संख्या वाढण्याचा अंदाज मंडळाने व्यक्त केला आहे. या संदर्भातील प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.