कामठीतील एनसीसी अधिकारी प्रशिक्षण अकादमीत झालेल्या शानदार सोहळ्यात १९२ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना असोसिएट एनसीसी अधिकारी म्हणून शपथ देण्यात आली. यानिमित्ताने झालेल्या शानदार पासिंग आऊट परेडची मानवंदना एनसीसी अधिकारी प्रशिक्षण अकादमीचे कमांडंट मेजर जनरल एम.एम.एस. भारज यांनी स्वीकारली. या सोहळ्याला सैन्यदल आणि नागरी सेवेतील वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशिक्षणार्थीचे नातेवाईक आवर्जून उपस्थित होते. पासिंग आऊट परेडनंतर झालेल्या समारंभात प्रशिक्षणार्थी छात्रांना हुद्दय़ाचे बॅज लावून एएनओ म्हणून सामावून घेण्यात आले.
भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. तरुणांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. युवा पिढी ही भारताची संपत्ती असल्याने युवा शक्तीचा विकास आणि राष्ट्र निर्माण कार्यात तरुणांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यात कामठीची एनसीसी ऑफिसर प्रशिक्षण अकादमी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या अकादमीत देशभरातील अधिकारी आणि अद्यापकांना एनसीसी अधिकारी म्हणून तीन महिनेपर्यंत अत्यंत कठोर प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षित एनसीसी अधिकारी देसबरातील विविध युनिट्समध्ये प्रशिक्षणाचे काम चोखपणे पार पाडतात.
संचालन सोहळ्यात ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ या गाण्याच्या धुनवर अत्यंत शिस्तबद्ध पथसंचलन सादर करून प्रशिक्षणार्थीनी साऱ्यांची मने जिंकली. यावेळी सिनियर डिव्हिजनमधील सीएसएम शशिभाल पांडे यांना डीजी बॅटन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले. ज्युनियर डिव्हिजनमधील ज्युनियर अंडर ऑफिसर नरेंद्र कुमार परमार यांना रौप्य पदकाचा मान मिळाला. शिवाजी कंपनीला सवरेत्कृष्ट कंपनीचा बहुमान मिळाला.