या जिल्हय़ात अवघ्या सात महिन्यात शासकीय व खासगी रुग्णालयात १९५ उपजत मृत्यू झाल्याची धक्कादायक नोंद घेण्यात आलेली आहे. यामध्ये १०० मुले व ९५ मुलींचा समावेश आहे. उपजत मृत्यूची ही आकडेवारी अतिशय थक्क करणारी आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
२२ लाख लोकसंख्या असलेल्या या जिल्हय़ात एक जिल्हा सामान्य रुग्णालय, १५ ग्रामीण रुग्णालय, ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३५० उप आरोग्य केंद्र तसेच जिल्हा, तालुका व ग्रामीण भागात खासगी डॉक्टरांचे प्रसूतीगृह आहे. शासकीय तसेच खासगी रुग्णालयात सप्टेंबर २०१३ ते मार्च २०१४ या गेल्या सात महिन्यात झालेल्या जन्ममृत्यूच्या आकडेवारीची नोंद घेतली असता १९५ बालकांचा उपजत मृत्यू झाला असल्याची माहिती यातून समोर आली आहे. विशेष म्हणजे ही सर्व जन्ममृत्यूची आकडेवारी महापालिकेत नोंदविण्यात आलेली आहे. यामध्ये सप्टेंबर २०१३ या महिन्यात एकूण ३० बालकांचा उपजत मृत्यू झालेला आहे. यामध्ये १६ मुलं तर १४ मुलींचा समावेश आहे. ऑक्टोंबर २०१३ मध्ये ३४ बालकांचा मृत्यू झाला असून यात २१ मुले व १३ मुलींचा समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात ३३ बालकांच्या उपजत मृत्यूची नोंद घेण्यात आली. यात मुले १७ व मुली १५ आहेत. डिसेंबर मध्ये २६ बालकांचा मृत्यू झाला. यात १३ मुले व १३ मुलींचा समावेश आहे. तर जानेवारी २०१४ मध्ये २४ बालकांचा मृत्यू झाला असून १८ मुल व १६ मुली आहेत. फेब्रुवारी महिन्यात २१ मुलामुलींचा मृत्यू झाला असून त्यात ८ मुले व १३ मुली आहेत.  मार्च महिन्यात १७ मुले तर १० मुली अशा २७ बालकांचा उपजत मृत्यू झाला आहे.
या सात महिन्यात शंभर मुले तर ९४ मुलींचा उपजत मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या उपजत मृत्यूत एक दिवसाच्या बालकापासून तर ९ महिन्याच्या बालकापर्यंतचा समावेश आहे. ही आकडेवारी अतिशय थक्क करणारी आहे. यात शासकीय म्हणजेच जिल्हा सामान्य रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील मृत्यूची नोंद अधिक आहे. त्याला कारण शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची योग्य काळजी घेतली जात नाही असा तक्रारींचा सूर आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या काही महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची विशेष काळजी घेतली जात नाही असे त्यांनी सांगितले.
प्रसूती झाल्यानंतर बाळाची, आईची नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. परंतु जिल्हा रूग्णालयात प्रसूती तज्ज्ञांच्या जागा रिक्त असल्याने नियमित आरोग्य तपासणी होत नसल्याचे या महिलांनी सांगितले. तसेच कुठल्याही प्रकारची सुविधा सुध्दा येथे नाही. प्रसूती कक्षात सर्वत्र दरुगधी व वासाचे साम्राज्य असते. त्यामुळे महिलांची राहण्याची तयारी नसते असेही या महिलांनी सांगितले. याउलट खासगी रुग्णालयात प्रसूत झालेल्या बालकांच्या मृत्यूची आकडेवारी कमी आहे. त्याला कारण खासगी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध होतात. तसेच बाळाची नियमित आरोग्य तपासणी होत असल्यामुळे उपजत मृत्यूची संख्या कमी असल्याचे सांगण्यात आले. या सर्व आकडेवारीची नोंद महानगरपालिकेच्या जन्ममृत्यू विभागात घेण्यात आली असली तरी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक याबाबत गंभीर नसल्याची बाब यानिमित्ताने समोर आली आहे. तसेच हा मृत्यू दर कमी होण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने कुठल्याही प्रकारचे ठोस प्रयत्न करण्यात आलेले नाही. या जिल्हय़ात स्वतंत्र महिला रुग्णालय नसल्यामुळे सुध्दा उपजत बालकांच्या मृत्यू अधिक प्रमाणात असल्याची प्रतिक्रिया काही महिलांनी व्यक्त केली. प्रत्येक शंभर मुलांच्या मागे ९५ मुलींचा मृत्यू होत असल्याने ही बाब खरोखरच गंभीर असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.