कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी संघटना व शेतक-यांनी लिलाव बंद पाडत, कृषिउत्पन्न बाजार समितीसमोर आज सुमारे अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. कांद्याला किमान पाच हजार रुपये भाव द्यावा अशी संतप्त उत्पादक शेतक-यांची मागणी होती. ती पूर्ण न झाल्याने बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले.
राहाता बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू होऊन भाव कमी निघाले, असे म्हणत शेतकरी संघटना व कांदा उत्पादक शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडले व नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. कांद्याला किमान पाच हजार रुपये भाव द्यावा तसेच केंद्र सरकारच्या धोरणाच्या निषेधाच्या घोषणाही या वेळी देण्यात आल्या.
संघटनेचे जितेंद्र भोसले, विठ्ठलराव शेळके, रूपेंद्र काले, राधू राऊत, जनार्दन घोगरे, पंचायत समितीचे माजी सभापती जालिंदर गाढवे, सुभाष तांबे, शिवाजी घोलप, मुक्ता पाटील पानगव्हाणे, भाऊसाहेब बोठे, विष्णू दिघे आदींच्या नेतृत्वाखाली शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. समितीचे सभापती भाऊसाहेब कडू, तहसीलदार अप्पासाहेब शिंदे, सचिव उद्धव देवकर, संचालक दीपक रोहोम आदींनी वारंवार आवाहन करूनही आंदोलक ऐकत नव्हते. अडीच तास आंदोलन सुरू होते. नंतर किमान पाच हजार रु. भाव द्यावा तरच लिलाव सुरू करा अशी भूमिका संघटनेने घेतली, त्यावर सहमती न झाल्याने आजचे लिलाव रद्द करण्यात आले. हे लिलाव आता उद्या करण्यात येणार असल्याची माहिती सचिव देवकर यांनी दिली.
आज बाजार समितीमध्ये १८ हजार गोण्यांची आवक होती. सकाळी ११.३० पासून शेतकरी परिसरातच ठाण मांडून बसले होते. आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला ३ ते ४ कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रविवारमुळे शिर्डी येथे जाणा-या भाविकांची वाहने दुतर्फा अडकून पडली होती. प्रवाश्यांनी गांडय़ांतून उतरून शिर्डीकडे पायी जाणे पसंत केले.
उत्पादनखर्चही फिटणार नाही
मटण ४०० रुपये किलो चालते, पिझ्झा २०० रुपयांना घेतला जातो, मात्र विकतचे पाणी घेऊन कांदापीक घेतले, महागडी खते व औषधे मारली, एका एकरात अवघ्या ३५ गोण्या उत्पन्न मिळाले, सात हजार रुपये भाव मिळूनही उत्पादन खर्च फिटणार नाही, अशी व्यथा देर्डे मढी येथील शेतकरी विष्णू दिघे यांनी व्यक्त केली. आज दोन ते अडीच हजार रुपये भाव निघत असून सरकारच्या कारवाईच्या इशा-यामुळे व्यापा-यांनी भाव पाडल्यांचा आरोप शेतकरी संघटनेने केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 19, 2013 1:50 am