तंबाखूजन्य पदार्थासह गुटखाबंदी पुन्हा वर्षभरासाठी वाढवण्यात आली असली, तरी ही बंदी नावापुरतीच असून पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात छुप्या मार्गाने मोठय़ा प्रमाणावर गुटखा आणला जात आहे. गुटख्याची विक्री रोखण्यात अन्न व औषध प्रशासन, तसेच पोलीस यंत्रणा कमकुवत ठरली आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्य़ांमध्ये गेल्या दोन वर्षांत २ कोटी ६० लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यानंतर गुटखा तस्करांनी परप्रांतातून छुप्या पद्धतीने गुटखा आणण्यासाठी व तो पुरवण्याची या तस्करांनी स्वतंत्र यंत्रणाच उभी करून सरकारी यंत्रणांसमोर आव्हान उभे केले आहे. अत्यंत नियोजनबद्ध व्यवस्था त्यासाठी आहे. गुटखा उपलब्ध असलेल्या राज्यांमधून वेगवेगळ्या मार्गाने गुटखा आणला जातो. रेल्वेमार्गाचाही वापर यात होत असून गुटखा साठा करणाऱ्यांवर पूर्णपणे अंकूश लावता आलेला नाही. गुटखांबदी अध्यादेशानुसार सुगंधित तंबाखू किंवा तंबाखूमिश्रित सुपारी, पानमसाला व गुटख्याची विक्री करण्यास राज्यात बंदी आहे. गुटख्याची खुली किंवा वेष्टणातील विक्री करणे, निर्मिती करणे किंवा विकणे हा गुन्हा ठरतो, पण धाक नसल्याने गुटखा तस्करांनी अजूनही कारवाया थांबवलेल्या नाहीत. गेल्या दोन वर्षांत अमरावती विभागात २ कोटी ६० लाख ९४ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
गेल्या २०१३-१४ या वर्षांत १ कोटी २६ लाख रुपये किमतीचा गुटख्याचा साठा पकडला गेला. सुमारे दीड हजारांवर दुकाने, गोदामांवर अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकले तेव्हा हे घबाड दोन वर्षांत हाती लागले. गुटखाबंदी कायद्याअंतर्गत गेल्या दोन वर्षांत २२७ प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला असून १४९ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर कारवाई करूनही गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळता येत नाहीत. कारण, या व्यवसायातील मर्म मोठय़ा प्रमाणात मिळणाऱ्या नफ्यात दडलेले आहे. गुटखा पुडय़ांच्या किंवा डब्यांच्या मूळ किमतीपेक्षा दुप्पट-तिप्पट दर आकारले जातात. गुटखा शौकिनांसाठी पैशापेक्षा तल्लफ महत्वाची ठरत असल्याने गुटखा तस्करांचे फावले आहे. पानटपऱ्यांजवळ विखुरलेल्या रिकाम्या पुडय़ा गुटखाबंदीला वाकुल्या दाखवत असतानाही यंत्रणा मात्र सुस्त असल्याचे चित्र या पाच जिल्ह्य़ांमध्ये आहे. गोपनीय माहिती मिळाल्यानंतरच अन्न व औषध विभागाकडून कारवाई केली जाते, पण त्याचा काहीही परिणाम या बाजारावर होताना दिसत नाही. पोलीस व अन्न व औषध प्रशासनात याबाबतीत समन्वयाचा अभाव असल्याचे सांगितले जाते. सीमेवर वाहनांच्या तपासणीची व्यवस्था असली, तरी भ्रष्ट व्यवस्थेतून गुटख्याचा साठा राज्यात पोहोचवणे गुटखा तस्करांसाठी सहज सुलभ बनले आहे. गोदामांवर छापे घालून मोठय़ा प्रमाणावर गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला असला, तरी प्रत्यक्ष वाहतुकीच्या वेळी झालेल्या कारवायांचे प्रमाण कमी आहे. गुटख्याची वाहतूक करणारी यंत्रणा प्रबळ असल्याने साठवणूक करणाऱ्यांपर्यंत गुटखा पोहोचतो. गुटखा विक्रेत्यांपर्यंत यंत्रणांना पोहोचता आले असले, तरी गुटखा पुरवण्याचे गेल्या काही वर्षांत विकसित झालेले जाळे भेदण्यात मात्र या यंत्रणांना यश मिळालेले नाही.