स्पिरीट घेऊन जाणारा टँकर पालथा होऊन घडलेल्या अपघातात दोघा गावकऱ्यांचा मृत्यू झाला. मोहोळ-मंद्रूप बाहय़वळण महामार्गावर कोरवली येथे मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामुळे टँकरमधील स्पिरीट रस्त्यावर सांडले. पोलिसांनी खबरदारी म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळ बंद केली. त्यामुळे या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
नगरच्या एमआयडीसी येथून बंगळुरू येथे स्पिरीट घेऊन निघालेला टँकर (केए ४१-ए २६०१) सकाळी मोहोळ तालुक्यातील कोरवली मार्गे मंद्रूपकडे बाहय़वळण महामार्गावरून जात होता. परंतु भरधाव वेगातील हा टँकर पालथा होऊन त्यात रस्त्यालगत पान टपरीजवळ थांबलेले विठ्ठल शंकर म्हमाणे (वय ५०) व गौरीशंकर गुरुबाळ बिराजदार (वय ५५, दोघे रा. कोरवली) हे टँकरखाली चिरडले जाऊन जागीच मरण पावले. तर टँकरचालकासह त्याच्यासोबत असलेले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहायक फौजदार असे दोघेजण जखमी झाले. त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, हा अपघात होताच टँकरमधील स्पिरीटची गळती होऊ लागली. स्पिरीट रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात सांडले गेले. तेव्हा सोलापूरच्या अग्निशामक दलाला पाचारण करून संभाव्य दुर्घटना टाळण्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याची फवारणी केली. कामती पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.