डिझेल संपले म्हणून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मालमोटारीवर भरधाव वेगाने टाटा टेम्पो येऊन आदळल्याने घडलेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. शहरातील देगाव-केगाव बाह्य़वळण रस्त्यावर हा अपघात घडला.
नामदेव वामन मिरेकर (वय ३०, रा. संजयनगर, बुलढाणा) व मालमोटारचालक बळीराम अर्जुन कबाडे (वय २३, रा. लऊळ, ता. माढा) अशी मृतांची नावे आहेत. तर अनिल लक्ष्मण पवार (वय २३) व विजय लक्ष्मण चौगुले (वय २५, दोघे रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) हे दोघे जखमी झाले. या संदर्भात सलगर वस्ती पोलिसांनी टेम्पोचालक मंगेश रामचंद्र महाडिक (वय २६, रा. वाघोली) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालक बळीराम कबाडे हा मालमोटार चालवत असताना वाहनातील डिझेल संपले म्हणून त्याने मालमोटार रस्त्याच्या कडेला थांबविली होती. त्याचवेळी प्रताप दत्तात्रेय थोरात (रा. लऊळ) हा आपला टेम्पो घेऊन याच रस्त्यावरून निघाला असता त्यास चालक बळीराम कबाडे याने हाक मारून थांबण्यास सांगितले. ही दोन्ही वाहने एकाच मालकाची असल्याने प्रताप थोरात याने आपला टेम्पो थांबविला. त्यावेळी कबाडे याने आपल्या मालमोटारील डिझेल संपल्याचे सांगून तुझ्या गाडीतील डिझेल दे म्हणून सांगत असताना अचानकपणे पाठीमागून भरधाव वेगाने आलेला एमएच १२ एचडी ४३९८ हा टेम्पो सदर मालमोटारीवर आदळला. यात मालमोटारचालक बळीराम कबाडे याच्यासह दोघांचा जीव गेला. तर अन्य दोघे जखमी झाले.