पंढरपूर तालुक्यातील भोसे-शेवरे रस्त्यावर कूपनलिका मारण्यासाठी निघालेल्या मालमोटारीलाअपघात होऊन त्यात दोघे परप्रांतीय मजूर जागीच मरण पावले. तर अन्य एक मजूर जखमी झाला. मालमोटारचालकाविरुद्ध करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर जिल्ह्य़ात यंदाच्या भीषण दुष्काळी परिस्थिीत पाण्यासाठी कूपनलिका मारण्याकडे ऐपतदार मंडळींचा कल दिसून येतो. त्यामुळे कूपनलिका मारणाऱ्या तामीळनाडू, केरळ, छत्तीसगढ आदी भागातील कूपनलिका मारणाऱ्या व्यावसायिकांना चांगले दिवस आले आहेत. पंढरपूर तालुक्यात एका शेतक ऱ्याच्या शेतात कूपनलिका मारण्यासाठी छत्तीसगढ येथील मालमोटार कूपनलिकेचे सामान व मजूर घेऊन निघाली असता भोसे ते शेवरे रस्त्यावर अचानकपणे सदर भरधाव मालमोटार रस्त्याच्या कडेला जाऊन पालथी झाली. या अपघातात जुमराम केशुराम मरकाम (वय ४६)व ईश्वर दलसू नेताम (वय २२, रा. छत्तीसगड) हे दोघे मजूर जागीच मृत्युमुखी पडले. तर चेतन डोरा नेताम हा जखमी झाला. मालमोटारचालक दादासाहेब प्रभू गुंड (रा. आष्टी, ता. मोहोळ) याच्याविरुद्ध करकंब पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अक्कलकोटमध्ये घरफोडी
अक्कलकोट येथे बासलेगाव रस्त्यावर राहणारे श्रीराम बाळासाहेब देशपाडे यांची घरफोडी होऊन चोरटय़ांनी एक लाख ७२ हजारांचा ऐवज लांबविला. देशपांडे हे घर बंद करून रात्री उकाडय़ामुळे गच्चीवर झोपायला गेले होते. तेव्हा चोरटय़ांनी घराचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, मोबाइल, कॅमेरा, लपटॉप आदी किमती ऐवज चोरटय़ांच्या हाती लागला. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे.