माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यातील सर्व भागातून वारकरी, भाविकभक्त येत असून माघी यात्रा सोहळ्यासाठी पंढरीत सुमारे दोन लाख वारकरी भाविक आले आहेत. पदस्पर्श दर्शनाची रांग मंगळवारी वैकुंठभूमी स्मशानसमोर उभारलेल्या पत्र्याच्या शेडपर्यंत गेली असून तीनही पत्राशेडमधून गर्दी आहे. २१ फेब्रुवारीला माघी एकादशी सोहळा आहे. येणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीकरता पंढरपूर नगरपरिषद व प्रशासन सज्ज झाले आहे. यात्रेवर दुष्काळाचे सावट असले तरी वारकरी विठ्ठलावर भरवसा ठेवून एक दिवस का होईना पंढरीत भक्तीसेवा अर्पण करीत आहेत.
पंढरीत मोठय़ा प्रमाणात वारकरी आले असून विठ्ठल दर्शनाबरोबर तेवढेच महत्त्व चंद्रभागा स्नानाला आहे. परंतु चंद्रभागा नदी कोरडी आहे. वाळवंटातून वाळू उपसा करून पडलेल्या डबक्यात साठलेल्या पाण्यात आंघोळीचा लाभ घेत आहेत. अंघोळीपुरते पाणी बंधाऱ्यातून नदीत सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
यात्रा काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे एक हजार जादा पोलीस होमगार्ड, महिला होमगार्ड, महिला व पुरुष पोलीस व अधिकारी असा बंदोबस्त तैनात असून चंद्रभागा वाळवंटात गस्त, साध्या वेशात व वारकऱ्याचे वेशात पोलीस बंदोबस्तास नेमले आहेत. तसेच गर्दीची ठिकाणे असलेली चौफाळा, प्रदक्षणा मार्ग, शिवाजी चौक, महाद्वार या ठिकाणी पोलीस बंदोबस्तास आहेत, असे पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांनी सांगितले.
यात्रेसाठी जादा बॉम्ब शोध व नाशक पथक, श्वान पथक तैनात असून हे पथक महत्त्वाचे ठिकाणी दिवसातून दोन वेळा तपासणी करत आहे. यावेळी माघी यात्रा व शिवाजी महाराज जयंती एकाच दिवशी आल्याने शहरात वारकऱ्यांच्या गर्दीबरोबरच जयंती साजरी करणारे मंडळाचे कार्यकर्ते यांची एकच गर्दी झाल्याने बंदोबस्तावर ताण आहे.
सोमवारी रात्री बॉम्बची अफवा
 सोमवारी संध्याकाळी गोविंदपूरा येथे असलेल्या बाराभाई तालमीजवळ एक अज्ञात बॅग आढळून आली. स्थानिक लोकांसह वारकरीही या बॅगेकडे कुतूहल अन भययुक्त नजरेने पहात होते. तेवढय़ात या बॅगेत बॉम्ब आहे अशी अफवा पससरली
ती अज्ञात बॅग पहाण्यास गर्दी जमली होती. तेवढय़ात बॉम्ब नाशक पथकाला खबर लागताच  श्वान पथकासह बॉम्ब नाशक पथकाचे हवालदार वाळुंजकर, पो. कॉ. जाधव, शेख मोरे, स्वामी व पुणे येथून यात्रेसाठी आलेले सात जणांचे पथक यांनी गोविंदपुरा गाठला. गर्दीस बाजूला करून या बऱ्याच वेळ पडलेल्या बेवारस बॅगेची तपासणी केली. त्यात कपडे, इतर सामान असे आढळून आल्याने सर्वानी सुटकेचा नि:श्वास टाकला.
या संदर्भात डी.वाय.एस.पी. प्रशांत कदम, शहर निरीक्षक प्रकाश सातपुते म्हणाले की, कोणीतरी ही बॅग विसरून गेले असावे किंवा एखाद्या चोरटय़ाने ही बॅग पळवून त्यात काही नसल्याने ती टाकून गेला असावा. या बॅगेत कपडय़ाशिवाय काहीच नव्हते. परंतु बराच वेळ बॅग पडल्याने बॉम्बची अफवा सर्वत्र पसरली होती. कोणास संशयित वस्तू वा व्यक्ती आढळून आल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.