सार्वजनिक वितरण प्रणालीतील रॉकेल काळाबाजारासाठी बाळगल्याप्रकरणी दोघाजणांना सोलापूरचे मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी.जाधव यांनी प्रत्येकी एक वर्षांची सक्तमजुरी व तीन हजारांचा दंड ठोठावला आहे.
अल्ताफ अल्लाउद्दीन शेख (रा. फक्रुद्दीन झोपडपट्टी, सोलापूर) व वाहीद अ. हमीद शेख (रा. कामाठीपुरा, उत्तर सदर बझार, सोलापूर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोषी आरोपींची नावे आहेत. हे दोघेजण ८ सप्टेंबर २००८ रोजी एमएच १२ बीडी ४४७६ या रिक्षातून प्लॅस्टिक कॅनमध्ये १३० लिटर निळे रॉकेल घेऊन सापडले होते. त्यांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांच्या गोदामात ४७० लिटर रॉकेलचा साठा सापडला. या दोघांविरुध्द जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी जाधव यांच्या समोर झाली. यात दोघा आरोपींविरुध्द गुन्हा सिध्द झाल्यामुळे त्यांना दंडासह सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.