एस. टी. महामंडळाच्या उदगीर आगारात गेल्या दोन वर्षांत २० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी रोखपालासह सहा वाहकांना निलंबित करण्यात आले. तिकीटविक्रीत गैरव्यवहार झाल्याचा संशय आल्यावरून महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उदगीर आगारातील १४५ तिकीटविक्री यंत्रांची तपासणी केली. यात दोन वर्षांत २० लाखांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार उदगीर पोलीस ठाण्यात रोखपाल व ६ वाहकांविरोधात तक्रार देण्यात आली. संबंधितांना सेवेतून निलंबित करण्यात आले. लातूर विभागातील ५ आगार व ट्रायमॅक्स कंपनी यांच्यात जुलै २०१० पासून करार झाला होता. ऑनलाईन तिकीट सेवा, आरक्षण व प्रवाशांना देण्यात येणारे तिकीट या बदल्यात कंपनीला २० पैसे कमिशन देण्यात येते. पाच वर्षांसाठी हा करार होता. एकटय़ा उदगीर आगारात २० लाखांचा अपहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्ह्य़ाच्या अन्य आगारांतील तिकीटविक्री यंत्रांची तपासणी केली जात आहे. लातूर आगारातील मुख्य सरवरही सील करण्यात आला आहे. महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी सर्व बाबींचा कसून तपास करीत आहेत. त्यामुळे आणखी किती रकमेचा अपहार उजेडात येतो याकडे संबंधितांचे लक्ष आहे.