सोलापूर रेल्वेस्थानकात थांबलेल्या सोलापूर-यशवंतपूर एक्स्प्रेसवर दुसरे रेल्वे इंजिन येऊन आदळल्याने गाडीच्या चार डब्यांमधील वीस प्रवासी किरकोळ जखमी झाले. मंगळवारी सायंकाळी ७.३०च्या सुमारास ही दुर्घटना घडली. दरम्यान, या घटनेची रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरू केली असून चौकशीनंतरच दोषींवर कारवाई करण्यात येईल असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
रेल्वेस्थानकातील प्लॅटफार्म क्र. १वर सोलापूर-यशवंतपूर एक्स्प्रेस थांबली होती. या गाडीचे इंजिन पुढील भागात जोडण्यात येणार होते. चालकांनी इंजिन प्लॅटफॉर्म क्र. २ वर घेत असताना इंजिनची गती अधिक असल्याने ते सोलापूर-यशवंतपूर एक्स्प्रेसवर आदळले. यात गाडीच्या चार डब्यांमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. अमीर कासीम पठाण, शोभा सुभेदार, स्नेहा मिहद्रकर, अमृता कटारे, चंद्रकांत भारगजे, सुमन पवार, राजाराम सोमा, मिनाज शेख, बानो आतार आदी प्रवाशांचा जखमींमध्ये समावेश आहे. काही प्रवाशांच्या डोक्याला दुखापत झाली. सर्व जखमी प्रवाशांना रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी उपचार पूर्ण झाल्यानंतर सर्व जखमींना घरी पाठविण्यात आले.