३१ नागपूरकरांनी १३ तासांत २०० किलोमीटर सलग सायकल चालवीत मध्य भारतातील पहिली ‘ब्रेव्हे’ पूर्ण केली. वरवर बघितले तर यात विशेष ते काय, असे वाटणे स्वाभाविकच. पण, हे केवळ सायकल चालवणे नव्हते. हे होते स्वत:च स्वत:ला सिध्द करणे, हे होते आपल्या क्षमता तपासून बघणे, स्वत:लाच शिस्त लावणे आणि आपले आयुष्य आत्मविश्वासाने परिपूर्ण करणे. जगभरात लोकप्रिय असलेला आणि आता भारतात रूजू लागलेल्या सायकलिंगच्या या प्रकाराचे मध्य भारतातील पहिलेच आयोजन नागपुरात करण्यात आले आणि ३१ जिगरबाज नागपूरकरांनी २०० किमी सायकलिंग करण्याचे आव्हान यशस्वीपणे पेलून दाखवले.
‘ब्रेव्हे’ हा क्रीडा प्रकार आपल्याकडे तसा फारसा माहीत नसलेला. मुळात आपल्यातल्या बहुतेकांना व्यायामाच तसा कंटाळाच, त्यातही सायकल चालविणे म्हणजे महाकठीण काम. परदेशातल्या सारखे सायकल चालवित आपल्या कामाच्या ठिकाणी जाणारे अगदीच मोजके लोक आहेत. त्यांच्याकडे महापराक्रमी वगैरे असल्यासारखे बघून आपला तो प्रांत नव्हे म्हणत पुन्हा गाडीला किक मारून निघून जाणे, हेच श्रेयस्कर मानणारे आपण. त्यामुळे २०० किमी सलग सायकल चालविणे, ही भुवया उंचावणारीच बाब. पण, ब्रेव्हे असतेच तशी. फ्रान्समध्ये मूळ असलेला हा क्रीडाप्रकार जगात सर्वत्र स्वीकारला गेलाय आणि आंतरराष्ट्रीय संघटनेद्वारे त्याचे नियंत्रणही केले जाते. अलीकडे, भारतातील विविध शहरात अशा ब्रेव्हे आयोजित केल्या जाऊ लागल्या आहेत. २८ डिसेंबरला या क्रीडाप्रकारातील प्राथमिक पायरी असलेली २०० किमीची ब्रेव्हे नागपुरात आयोजित केली होती. झिरो माईलपासून सावनेर मार्गे मध्यप्रदेश सीमेपर्यंत सायकलने १०० किमी जाणे व तेवढेच अंतर परत येणे, असे या आयोजनाचे स्वरूप होते. ज्या ३१ नागपूरकरांनी नेटाने हे लक्ष्य पूर्ण केले त्यात सर्वात कमी वयाचा १८ वर्षांचा अंकित बिहारी होता, तसेच ६१ वर्षांचे भोजराज मेश्रामही होते. रोज सायकल चालविण्याचा सराव करणारे होते तसेच या ब्रेव्हेसाठी नवी सायकल घेणारेही होते. विद्यार्थी, उद्योजक, नोकरदार, वकील, डॉक्टर अशा वेगवेगळ्या व्यवसायातील सर्वानी स्वत:च्या मर्यादांवर मात करत २०० किमी सायकल चालविली. सकाळी ५.३० ला सुरू झालेली ही शर्यत पूर्ण करण्यास स्पर्धकांनी कमीत कमी साडेनऊ तास ते १२ तास एवढा कालावधी घेतला.  
या सगळ्यांचा एकच उद्देश होता, स्वत:ला सिध्द करणे. रोजचं आयुष्य जगताना कधीतरी माघार पत्करावी लागणार, खूप प्रयत्न करूनही पराभवच वाटय़ाला येणार. स्वत:च्याच क्षमतांवर  आपणच शंका घ्यावी अशी परिस्थिती कधी तरी निर्माण होणारंच. पण, निराश न होता सर्व शक्तीनिशी प्रयत्न केलेत तर एरवी कठीण वाटणारं कामंही सहजसाध्य होतं. नागपूरातील या ३१ जणांनी हे करून दाखवलं आहे. त्यातून मिळालेला आत्मविश्वास घेऊन हे सगळे जण नव्या वर्षांचा नव्या उमेदीने प्रारंभ करणार आहेत.
‘मुळात सायकल चालवणे हे काही महान काम नाही. पण आपल्याकडे त्याचे अप्रूप आहे. ‘ब्रेव्हे’ ही काही गाजावाजा करण्याची गोष्ट नव्हे किंवा २०० किमी अंतर पूर्ण करून तुम्ही काही विक्रम करीत नसता. ते तुम्ही तुमच्या आनंदासाठी करत असता. प्रत्यक्षात सर्वाना घेऊन जाण्याचा, स्वत:च्या क्षमता तपासण्याचा हा क्रीडाप्रकार आहे. सायकल चालवणं हे आपल्या जीवनशैलीचा एक भाग व्हावा, हे सांगणारं ब्रेव्हे एक माध्यम आहे. जे जे सहभागी झालेत त्यांना आपण २०० किमी सायकल चालवू शकू यावर विश्वास नव्हता. आता, ते ब्रेव्हे आयोजित केल्याबद्दल धन्यवाद देत आहेत. आता आम्ही अधिक पल्ल्याच्या ब्रेव्हे आयोजित करणार आहोत,’ असे सायकलिंग लोकप्रिय व्हावे याचा प्रयत्न करणारे अनिरुध्द रईच यांनी सांगितले.

रोजच्या जीवनातील अडचणींनी इतरांसारख्याच मला पण आहे. पण, मी पण काही तरी करू शकतो, केवळ या एका भावनेने मी यावेळच्या ब्रेव्हेमध्ये सहभागी झालो. २०० किमी सायकल चालविल्यानंतर माझ्यात झालेला बदल मी अनुभवतो आहे. आता यानंतर मी ३०० किमी ब्रेव्हेमध्ये सहभागी होणार आहे.
शैलेश बनसोड, आयटी व्यवसायी