News Flash

सुवर्णपदक विजेत्या क्रीडापटूला २० हजार रुपयांचे बक्षीस?

मीडियाच्या आग्रहाला बळी पडून शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांनी अश्वमेधमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूला २० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले मात्र, सर्वाची त्याला

| January 17, 2013 03:49 am

*  अश्वमेध-२०१२ आजपासून सुरुवात *   कुलपतींच्या गैरहजेरीत उद्घाटन होणार       *   पूर्वसंध्येला कार्यक्रमाची रंगीत तालीम

मीडियाच्या आग्रहाला बळी पडून शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांनी अश्वमेधमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूला २० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले मात्र, सर्वाची त्याला सहमती दिसून आली नाही. १६व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव २०१२ म्हणजे ‘अश्वमेध’मध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडापटूला २० हजार रुपयांचे बक्षीस पत्रकार परिषदेत डॉ. बबन तायवाडे यांनी घोषित केले. विद्यापीठासाठी बक्षीस जिंकून आणणाऱ्या खेळाडूंना पाहिजे तसा सन्मान मिळत नाही. त्यांनी केलेल्या श्रमाचे योग्य मूल्यमापन विद्यापीठ करीत नाही, असे पत्रकारांचे म्हणणे होते. पत्रकारांनी हा विषय छेडल्यावर स्वत: कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी पहिल्यांदा व्यवस्थापन परिषदेत प्रस्ताव ठेवून तो सर्वानुमते मंजूर केला जाईल, अशी भूमिका घेतली. मात्र पत्रकारांच्या दबावामुळे डॉ. तायवाडे यांनी स्वत:तर्फेच २० हजार रुपयांची घोषणा केली आणि नंतर मात्र सारवासारव केली. एकीकडे पत्रकार परिषदेत आयोजनकर्त्यांचे एकमत त्यावर होत नसताना दुसरीकडे पत्रकारांमध्येही नेमक्या रकमेविषयी एकवाक्यता नव्हती. काहींनी २० हजार रुपयांच्या बक्षिसाच्या रकमेला सहमती दर्शवली तर काहींनी विद्यापीठाच्या वित्त विभागात फाईल अडकेल म्हणून पाच हजार रुपये बक्षिस देण्याची मागणी करीत रौप्य व कांस्यपदक विजेत्यालाही त्या प्रमाणात बक्षीस दिले जावे, अशी सूचना केली. सरतेशेवटी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत हे ठरवले जाईल, असा मुद्दा डॉ. तायवाडे यांनी पुढे
रेटला.
एकूण १८ विद्यापीठांनी अश्वमेधमध्ये सहभाग नोंदवला असून धावणे, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, वॉलिबॉल, हँडबॉलच्या पुरुष व महिलांचे संघ नागपुरात दाखल झाले आहेत. क्रीडा महोत्सवाची ज्योत सहा जिल्ह्य़ांतून पुन्हा नागपुरात दाखल झाली आहे. एकूण २८० सामने विविध क्रीडांगणावर होणार आहेत. धावपटू रोहिणी राऊत ध्वजसंचलनाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनंजय वेळूकर होते. आज सायंकाळी विविध क्रीडा प्रकाराच्या क्रीडांगणांचे उद्घाटन नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे यांनी केले. उद्या, १७ जानेवारीच्या उद्घाटन कार्यक्रमाची रंगीत तालीम सुभेदार हॉल समोरील क्रीडांगणावर घेण्यात आली. भोसला मिल्ट्री स्कूलच्या विद्यार्थ्यांचा बँडही यावेळी मैदानावर तैनात करण्यात आला होता. सारे जहाँ से अच्छा.. या गीताच्या धूनवर विविध विद्यापीठांच्या संघांनी कुलगुरूंनासलामी दिली.
गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धामुळे खेळाडूंमध्ये उत्साह होता. राज्यभरातून आलेल्या विविध विद्यापीठाच्या चमूंचा उत्साह वृद्धिंगत करण्यासाठी कुलपती के. शंकरनारायण अश्वमेधच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहू राहणार होते. मात्र, त्यांनी उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी असमर्थता दर्शवली. त्यामुळे उद्घाटन एखाद्या नेत्याच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.
पाच दिवस होऊ घातलेल्या अश्वमेधसाठी उपस्थित खेळाडूंची राहण्याची व जेवणाची सोय व्यवस्थित करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 3:49 am

Web Title: 20000 prise award to golden medel winner player
टॅग : Award,Sports
Next Stories
1 वन विभागाची धडक मोहीम; नारातील अतिक्रमण हटविले
2 अंगणवाडी सेविकांच्या नियुक्त्यांचा प्रश्न गंभीर
3 गोंदियानंतर आता राज्यातीलही शाळांमध्ये पोहोचणार ‘गावची शाळा, आमची शाळा’
Just Now!
X