आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुंबई पोलिसांनी परवानाधारक शस्त्रधारकांकडील शस्त्रे जमा करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवापर्यंत १३ हजार शस्त्रधारकांपैकी एकूण २०५ जणांची शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. यापूर्वी प्रत्येक निवडणुकीच्या आधी खबरदारीचा उपाय म्हणून ज्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे, त्यांच्याकडील शस्त्रे जमा केली जात असत. परंतु यावेळी न्यायालयाने आढावा घेऊन शस्त्रे जमा करण्याचे आदेश दिल्यानंतर दोन समित्या बनविण्यात आल्या.
पहिली समिती विभागीय उपायुक्तांची आहे. ती आपापल्या विभागातील शस्त्र परवानाधारकांची यादी छाननी करून पडताळणी समितीकडे पाठवते. या पडताळणी समितीत सहपोलीस आयुक्त (प्रशासन) आणि पोलीस उपायुक्त (मुख्यालय १) यांचा समावेश आहे.
खरोखरच शस्त्र बाळगण्याची गरज आहे का याचा अभ्यास करून ही समिती संबंधितांना शस्त्रे जमा करण्याचे आदेश देत आहेत. मुंबईत एकूण १३,७८६ लोकांकडे शस्त्र परवाना आहे. समितीने पडताळणी करून मंगळवापर्यंत २०५ जणांची शस्त्रे जमा करून घेतली आहेत.
याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त (अभियान) बारकुंड यांनी सांगितले की, समिती तीन निकषांचा अभ्यास करून शस्त्रे जमा करायची का नाहीत याचा निर्णय घेते. पहिला म्हणजे वैयक्तिक कारणासाठी शस्त्र घेतले असेल तर त्याची खरोखरच गरज आहे का ते पडताळले जाते. याशिवाय कुणी सुरक्षा एजन्सीसाठी परवाने घेतले असतील किंवा एखाद्या खेळाडूने रायफल शूटिंग इत्यादीच्या सरावासाठी शस्त्रे घेतली असतील तर त्यांना यातून सललत मिळते.
ज्यांच्या जीवाला धोका आहे आणि ज्यांना खरोखरच शस्त्रे बाळगण्याची आवश्यकता असेल तर त्यांना शस्त्रे ठेवण्यास परवानगी मिळते. समितीच्या अहवालानंतर यापुढे आणखी लोकांना शस्त्रे जमा करावी लागणार आहे, असेही बारकुंड म्हणाले.