खरिपानंतर रब्बी हंगामातही नगर जिल्ह्य़ाला राज्यात सर्वाधिक पीकविमा मिळाला आहे. गेल्या रब्बी हंगामाची ही भरपाई असून जिल्हय़ाला तब्बल २११ कोटी रुपये मिळाले आहेत. जिल्हय़ात पारनेर तालुक्याला सर्वाधिक म्हणजे ५० कोटी ५२ लाखांचा पीकविमा मिळाला आहे. ते जिल्हय़ातच नव्हेतर देशात सर्वाधिक आहे. खरिपातही पारनेरनेच सर्वाधिक नुकसान भरपाई मिळवली होती.  
गेल्या रब्बी हंगामातील पीकविम्याचे प्रस्ताव नुकतेच मंजूर करण्यात आले. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. राज्याला एकूण ५६२ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असून त्यातील ४० टक्के निधी एकटय़ा नगर जिल्हय़ाने मिळवला आहे.
तालुक्यातील ४६ हजार ६४ शेतक-यांना या पीकविम्याचा फायदा होणार असून ५३ हजार ८१६ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्यात येऊन ५० कोटी ५२ लाख ८१ हजार ७१७ रुपयांच्या पीकविम्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी ७ कोटी २५ लाख ९३ हजार ६४७ रुपयांचा प्रीमियम विमा कंपनीकडे जमा करण्यात आला होता. त्यापैकी ५० कोटी ४ लाख ८१ हजार ६४ रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असून लवकरच तो शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. विखे यांच्या पाठपुराव्यामुळेच तालुक्याला एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पीकविमा मिळू शकला असे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल झावरे यांनी सांगितले.  
जिल्ह्य़ात सलग दोन वर्षे दुष्काळ पडल्याने गेल्या वर्षी बहुतेक शेतक-यांची पेरणी वाया गेली होती. त्यामुळे पीकविम्याचा प्रीमियम भरण्यासाठी कमी अवधी होता. मात्र कृषिमंत्री विखे यांनी पुढाकार घेऊन ही मुदत वाढवून घेतली होती. त्याचाच जिल्ह्य़ासह राज्याला मोठा फायदा झाला.
जिल्ह्य़ातील अन्य तालुक्यांना मिळालेला पीकविमा पुढीलप्रमाणे आहे. अकोले- ५ लाख ४७ हजार ३०९, जामखेड- २६ कोटी ५३ लाख ९ हजार ८७६, कर्जत- १९ कोटी १५ लाख १६ हजार ८०७, कोपरगाव- ८ कोटी ८१ लाख ६६ हजार १९५, नगर- ३७ कोटी २८ लाख ३९ हजार ७४२, नेवासा- ३ कोटी ७० लाख २४ हजार ४२६, पाथर्डी- २९ कोटी ५ लाख ७३ हजार १७, राहता- १ कोटी ८३ लाख ६२ हजार ४७१, राहुरी- १ कोटी १२ लाख १९ हजार २०५, संगमनेर- ८ कोटी ७७ लाख ६५ हजार ७५४, शेवगांव- १७ कोटी ५२ लाख ३ हजार २८, श्रीगोंदा- ७ कोटी ८३ लाख १७ हजार ३३५ आणि श्रीरामपूर- ८ लाख ११ हजार ९९५.