भरती आणि ओहोटीप्रमाणे आतापर्यंत या जगात अनेक संस्कृतींचा उगम झाला आणि त्या लोपही पावल्या, परंतु भारतीय संस्कृती वैश्विक, सनातन, सदा नूतन आहे. २१ वे शतक भारताचे आहे. भारतच पुन्हा जगद्गुरू होणार आहे, असे मौलिक विचार महासंगणकाचे प्रथम निर्माते, पुण्यातील ई.टी.एच. लॅबचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त धंतोलीतील रामकृष्ण मठात आयोजित आंतरराज्य युवक संमेलनाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून डॉ. भटकर बोलत होते. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, अलाहाबाद येथील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी निखिलात्मानंद आणि इस्त्रोचे माजी शास्त्रज्ञ डॉ. टी.जी.के. मूर्ती उपस्थित होते.
‘भारतीय सांस्कृतिक वारसा आणि विश्व शांतीचे आदर्श’ या विषयावर युवकांना मार्गदर्शन करताना डॉ. भटकर म्हणाले, विज्ञान हे प्रपंचाचे ज्ञान आहे. या ज्ञानाला पूर्ण समजणे अज्ञान आहे. अपूर्ण किंवा अर्धे ज्ञान अत्यंत धोकादायक आहे. आजच्या संस्कृतीत विकृती आली आहे. आध्यात्माशिवाय ज्ञान पूर्ण होत नाही, हे स्वामी विवेकानंदांनी ओळखले होते. आध्यात्मिक शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी गुरुकुल, आश्रम अशी व्यवस्था निर्माण झाली. हे ज्ञान शाळेत मिळणार नाही. आध्यात्मिक शिक्षणामुळे विवेक जागृत होतो.
अनुभूतीपूर्ण ज्ञान हेच खरे आध्यात्म आहे. ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालण्याची गरज आहे. आपल्या देशाचे भवितव्य नावातच लिहिलेले आहे. विश्वची माझे घर सांगणारी आपली संस्कृतीच सर्वश्रेष्ठ आहे. आध्यात्मिक ज्ञान समजून घेण्याची आज गरज आहे. स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेले विचार आत्मसात करण्याची गरज आहे. युवकांनो, स्वामीजींनी सांगितलेले विचार जीवनात उतरवा, असे आवाहन त्यांनी केले.
‘गौरवशाली भारतीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा’ या विषयावर डॉ. वेदप्रकाश मिश्रा, ‘स्वामी विवेकानंद आणि आधुनिक विज्ञान’ या विषयावर डॉ. टी.जी.के. मूर्ती आणि ‘भारताच्या जागृतीसाठी युवकांना स्वामी विवेकानंद यांचे आवाहन’ या विषयावर स्वामी निखिलात्मानंद यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. राज्यात होत असलेले हे सर्वात मोठे संमेलन आहे. या संमेलनात उत्तरप्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, महाराष्ट्र या पाच राज्यांतून तीन हजारांवर तरुण सहभागी झाले आहेत.
उद्या शुक्रवारी, १५ नोव्हेंबरला सकाळी ८.४५ वाजता सुरू होणाऱ्या पहिल्या सत्रात ‘व्यक्तित्वाचा विकास’ या विषयाव वडोदरा येथील रामकृष्ण मिशनचे सचिव स्वामी निखिलेश्वरानंद, गांधीनगर येथील बाल विद्यापीठाचे सल्लागार डॉ. ज्योतिबेन थानकी, औरंगाबाद येथील रामकृष्ण मिशनचे सचिव स्वामी विष्णुपादानंद यांची व्याख्याने होतील. कार्यक्रमाचे संचालन स्वामी आत्मश्रद्धानंद यांनी केले.
इंदूर येथील रामकृष्ण मिशनचे सचिव स्वामी राघवेंद्र यांनी आभार मानले.