माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिवाजी विद्या प्रसारक संस्था, जवाहर शिक्षण प्रसारक संस्था, जवाहर मेडिकल फाऊंडेशन, जवाहर एज्युकेशन सोसायटी आणि जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी येथील कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या पगाराची रक्कम २३ लाख १४ हजार रुपये महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा करण्यात आली. या रकमेचा धनादेश गुरुवारी मुंबई येथे शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आला.
राज्यात पिण्याच्या पाण्यासह चारा आणि अन्नधान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्त भागात शासनाच्या वतीने तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने चारा छावण्या उभारण्यात आल्या असून संस्थांच्या वतीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीस मदत करण्यात येत आहे.
माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखालील संस्थामधील कर्मचाऱ्यांनीही त्यात हातभार लावला. माजी आमदार म्हणून रोहिदास पाटील यांना मिळणाऱ्या पेन्शनचे एक महिन्याचे वेतनही मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा करण्यात आला. मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या स्वाधीन करताना डॉ. पाटील यांच्यासह अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष देवरे, जवाहर सूतगिरणीचे अध्यक्ष कुणाल पाटील, शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे सचिव उत्कर्ष पाटील, उपाध्यक्ष प्रफुल्ल सिसोदे, डॉ. एस. टी. पाटील, खजिनदार गुणवंत देवरे, नाशिकच्या माजी नगरसेविका ममता पाटील आदी उपस्थित होते.