नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्य़ात यावर्षी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत २३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. जंगलयुद्धनिती आणि गनिमी काव्याचा अवलंब केल्याने नक्षलवाद्यांच्या कॅडरवर दबाव वाढविण्यात पोलीस यंत्रणेला यश मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नक्षलविरोधी अभियानाच्या विशेष माहिती व जनसंपर्क कक्षाने ही माहिती दिली आहे.
स्वतंत्र गडचिरोली जिल्ह्य़ाची निर्मिती १९८३ साली करण्यात आली होती. राज्याच्या एकूण जंगलक्षेत्रफळापैकी ७५ टक्के जंगल एकटय़ा गडचिरोली जिल्ह्य़ात आहे. महाराष्ट्र-आंध्र प्रदेशच्या सीमेवरील लंकाचैन या गावातून महाराष्ट्रात नक्षलवादाचा प्रवेश झाला. गडचिरोली जिल्हा अस्तित्वात येण्यापूर्वीच या भागात नक्षलवादाचा प्रसार सुरू झाला होता. त्यामुळे नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी विशेष अभियान राबविले जात आहे. गेल्या काही वर्षांत नक्षलविरोधी मोहीम अधिक आक्रमकतेने राबविली जात असल्याने नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले आहेत.
गडचिरोलीत पहिला नक्षलवादी १९८० साली मारला गेला. त्यानंतरच चार-पाच वर्षे पोलिसांना नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाईत फारसे यश मिळाले नाही. मात्र, त्यानंतर पोलिसांनी मोठी आघाडी उघडली. १९८६ साली आणखी एक नक्षलवादी ठार करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर दुसऱ्या वर्षी १९८७ साली दोन नक्षलवादी पोलिसांच्या कारवाईत मारले गेले. नक्षलवाद्यांकडून गरीब आदिवासींचा ढाल म्हणून वापर करण्यात येत असल्याने पोलिसांना कारवाई करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अत्यंत विपरित परिस्थितीत पोलिसांना नक्षलवाद्यांविरुद्ध लढावे लागत आहे. नक्षलवाद्यांविरुद्धच्या मोहिमेला १९९० ते १९९५ या काळात वेग आला. या पाच वर्षांत तब्बल २० नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा केला. यात १९९३ साली सर्वाधिक दहा, १९९० मध्ये १, १९९१ मध्ये ७, यानंतर १९९४ मध्ये १ नक्षलवादी ठार झाला. यानंतरही मोहीम पुढे सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे १९९६ ते २००० दरम्यान ७ नक्षलवाद्यांना टिपण्यात यश मिळाले.
सर्वात मोठी कारवाई २००३ साली करताना पोलिसांनी आठ नक्षलवाद्यांना संपविले. पुढे याची व्याप्ती वाढविण्यात आल्यानंतर २००४ साली चार नक्षलवाद्यांना संपविण्यात आले. यापैकी तिघांचे मृतदेह मिळाले परंतु, एक मृतदेह हाती लागू शकला नव्हता. याच वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात नक्षलवाद्यांनी देवसूर रोड येथे पोलिसांचे हत्याकांड घडवून आणण्यासाठी भू-सुरुंग ठेवण्याचा प्रयत्न केला असता त्याचा स्फोट होऊन एक नक्षलवादी मारला गेला होता. २००५ सालच्या चकमकीत तिघा नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले.
२००६ साली सर्वात मोठी चकमक होऊन २२ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ही आतापर्यंतची अत्यंत भीषण चकमक समजली जाते. नंतरच्या कारवाईत २००७ साली ७ नक्षलवादी ठार झाले. तर पुढच्याच वर्षी त्यापेक्षा अधिक सरस कामगिरी करताना ११ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यानंतर २००९ साली सात, २०१० साली दोन, २०११ साली सात आणि २०१२ साली चार नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. पोलिसांच्या मोहिमेला यंदा सर्वात मोठे यश मिळाले असून जानेवारी ते ऑगस्ट या काळात २३ नक्षलवादी ठार झाले आहेत. आतापर्यंतच्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्य़ात एकूण १३० नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले असून त्यापैकी ११६ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. उर्वरित १४ मृतदेह मिळालेले नाहीत. एकूण ४० नक्षलवादी गंभीर जखमी झाले आहेत. नक्षलविरोधी मोहीम राबविताना १७१ पोलीस शहीद झाले असून ४३३ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.