नापिकी व पावसाच्या प्रकोपाने यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यांच्या विळख्यात सापडला आहे. जिल्ह्य़ात गेल्या तीन महिन्यात २३ शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या असून सरकारचे उदासीन धोरण याला जबाबदार आहे, असा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.
यावर्षी जूनपासून सुरू असलेल्या पावसामुळे यवतमाळ जिल्ह्य़ाची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. जिल्ह्य़ात तीन महिन्यात २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पूरग्रस्त शेतक ऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी एकाही शेतकऱ्याच्या दारावर जाऊन मदत तर सोडा, पण चौकशीही केली नाही. कोतवालाच्या माहितीने तलाठय़ाने तयार केलेला सरकारी अहवाल सरकार संसदेत ठेवते, ही दुदैबी बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी २ हजार कोटी रुपयांची मदत घोषित केल्यानंतर आतापर्यंत पूरग्रस्त भागाची पाहणी व नापिकीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण केलेला नाही. अशा सनदी अधिकाऱ्यांची जिल्ह्य़ातून बदली करावी, अन्यथा जिल्ह्य़ात शेतकरी आत्महत्या वाढतील, अशी भीती तिवारी यांनी व्यक्त केली.
जूनपासून पावसाचा तडाखा बसत असल्याने संपूर्ण खरीप हंगाम हातचा गेलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण जिल्हाधिकारी शेतीव्यतिरिक्त कारणे, घरगुती कारणे व व्यसनाधिनतेमुळे आत्महत्या होत असल्याची माहिती सरकारला देत आहेत. जिल्ह्य़ात ५० हजार एकरावरील उभी पिके नष्ट झाली आहेत. २२ हजारांच्यावर घरे पडली आहेत. शेतकरी व शेतमजूर गेल्या तीन महिन्यांपासून उपासमारीला तोंड देत आहेत, मात्र अधिकाऱ्यांनी शेतकरी व शेतमजुरांना मदत दिलेली नाही. जिल्ह्य़ातील बँकांही शेतकऱ्यांना पीक कर्जही देत नाही. सरकारी रुग्णालयातही उपचार मिळत नाहीत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत धान्याचे वितरणही होत नाही. आदिवासींना खावटीचे वाटपही झालेले नाही. जिल्ह्य़ातील शेतक ऱ्यांच्या आत्महत्येला सरकारचे उदासीन धोरण जबाबदार असल्याचा आरोप तिवारी यांनी केला.

आत्महत्या करणारे शेतकरी
सुभाष साखरकर (डोळंबवाडी), संतोष राठोड (धानोरा), मनोहर भोयर (तरोडा), मनोहर देठे (वडगाव), लक्ष्मण टेकाम (महाडोळी), विट्ठल व्यवहारे (थेरडी), मधुकर फुणसे (पहूर), दादाराव मेश्राम (नाकापार्डी), भुमन्ना अंधेवार (पेंढरी), अनिल मरापे (ठाणेगाव), संतोष सिडाम (मंगी), मंचक जाधव (कुपटी), नथ्थू झाडे (बोदाड), भिका राठोड (पन्हाळा), नरेंद्र ठाकरे (कोसदनी), मधुकर शिवणकर (दहेगाव), गजानन गटकावार (वांजरी), गणेश पंधरे (कापेश्वर), अतुल देठे (वडगाव), गजानन बावणे (चिंचोली), मंगेश चरडे (गंगादेवी), कैलास खंडरे (डोंगरखर्डा) व प्रदीप पवार (शिवरतांडा)