गणेशोत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सांगली-मिरज शहरात २४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून २४ तास पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून असल्याचे पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी गुरुवारी झालेल्या शांतता समितीच्या बठकीत सांगितले. बठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह होते.
सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आणि मिरजच्या बालगंधर्व नाटय़गृहात शांतता समितीची बठक आज झाली. बठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी अनेक सूचना मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, मंडळाच्या कार्यकर्त्यांना एक खिडकी योजनेअंतर्गत परवानग्या मिळाव्यात. वीज पुरवठा अखंडित व्हावा आदी मागण्यांसह मंडळाचे देखावे बंदिस्त असतील तर गणेशभक्त उपस्थित असेपर्यंत सादर करण्याची परवानगी असावी अशा सूचना मांडल्या.

सूचना मांडण्यामध्ये आ. सुरेश खाडे, माजी महापौर विजय धुळूबुळू, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विराज कोकणे, अभिजित हारगे, रिपाइंचे अशोक कांबळे, प्रकाश इनामदार आदींचा समावेश होता.
या बठकीत पोलीस अधीक्षक सावंत यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देण्याची पोलिसांची भूमिका असणार नाही असे सांगत देशातील सद्य परिस्थिती लक्षात घेऊन आसपास काही अनुचित प्रकार किंवा संशयीत वस्तू अथवा इसम आढळल्यास तत्काळ पोलिसांना कल्पना द्यावी. अत्याधुनिक यंत्रणेसह बॉम्बशोधपथक तनात करण्यात आले असून त्यांच्या मार्फत दक्षता बाळगली जाईलच. याशिवाय शहराच्या विविध भागात २४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून २४ तास लक्ष दिले जाईल. वाद्यांचा आवाज पर्यावरणपूरक सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मर्यादेत असेल तर हरकत घेण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही असे त्यांनी सांगितले.
यावेळी महापालिका आयुक्त संजय देगावकर यांनी नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी महापालिकेत नियंत्रण कक्ष उघडण्यात आला असून विविध विभागातील कर्मचारी या ठिकाणी २४ तास उपलब्ध असतील असे सांगितले.
जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना सहकार्याचे आवाहन करीत मंडळाच्या मूर्तीची सुरक्षा करण्यासाठी मंडळाचेच कार्यकत्रे तनात ठेवण्याची सूचना मांडली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन करून वीज मंडळ, बांधकाम विभाग, स्वच्छता विभाग यांनी शहरांचे निरीक्षण करून दोन दिवसात अहवाल सादर करण्याची सूचना केली. या सव्र्हेक्षणात आढळून आलेल्या त्रुटींचे तत्काळ निराकरण करण्याच्या सूचना देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.