तालुक्यातील सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी १९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चैत्रोत्सवात कमालीची वाढ होत असल्याने या कालावधीत गडावरील भारनियमन बंद करून पूर्णवेळ वीज पुरवठा करण्यात येणार आहे. प्रांताधिकारी भिमराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील मुख्य अधिकारी, व्यावसायिक व ग्रामस्थांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत हे स्पष्ट करण्यात आले.
चैत्रोत्सवाची पूर्वतयारी म्हणून आढावा बैठक झाली. चैत्रोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे बस स्थानक लवकर तयार करावे, बस स्थानक परिसरात दोन नियंत्रण कक्ष, शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांना बसण्याची व्यवस्था तसेच नियोजित स्थानकात मुरूम व खडी टाकून व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. ही कामे आठ दिवसात पूर्ण न झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा प्रांत अधिकाऱ्यांनी दिला आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक, महिला उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, कर्मचारी, महिला होमगार्ड, ग्रामसुरक्षा दल, अग्निशामक दल आदींचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून नांदुरी ते सप्तशृंग गडावर जाण्यासाठी ७० गाडय़ा तसेच ३५० गाडय़ा जळगाव, धुळे व इतर ठिकाणांहून भाविकांना ने-आण करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अपघाती वळणांवर वाहन नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून गडावरील खासगी वाहतूक १७ ते २२ एप्रिल या कालावधीत पूर्णत : बंद करण्यात येणार आहे. ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
बैठकीस तहसीलदार बाबासाहेब गाढवे, ट्रस्टचे वसंत देशमुख, दिलीप वनारसे, पोलीस निरीक्षक विलास खोत, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.