वाळकेश्वर येथील सचिन अग्रवाल या व्यापाऱ्याच्या घरातील २४ लाखांचे दागिने घेऊन फरार झालेल्या नोकराला मलबार हिल पोलिसांनी बिहारमधून अटक केली. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी तो या घरात कामाला लागला होता.   इलियास मोहम्मद वाली (२३) असे या नोकराचे नाव आहे. वाळकेश्वर येथील दोशी पॅलेस या इमारतीत राहणाऱ्या वाहतूक व्यावसायिकाच्या घरी इलियास कामाला होता. त्याने आपले नाव राकेश आहे असे सांगितले होते. विशेष म्हणजे या अग्रवाल यांनी इलियासची पोलीस पडताळणीही करवून घेतली होती. २० एप्रिल रोजी अग्रवाल यांच्या घरातून सामान हलविण्याचे काम सुरू होते. त्यावेळी इलियास काही खासगी कामानिमित्त बाहेर पडला तो आलाच नाही. तीन दिवस वाट पाहिल्यानंतर इलियासने काम सोडले असावे असे त्यांना वाटले. २४ एप्रिल रोजी अग्रवाल यांना आपल्या घरातील सोने आणि हिऱ्याचे २४ लाखांचे दागिने चोरीला गेल्याचे आढळले. मलबार हिल पोलिसांनी याप्रकरणाचा तपास इलियास याच्या मोबाईल फोनच्या टॉवर लोकेशनवरून सुरू केला. हा मोबाईल बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील जलगेर या गावात असल्याची माहिती मिळाली होती. मलबार हिल पोलिसांच्या पथकाने इलियासला तेथे जाऊन अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत साडेबारा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी इलियासचा साथीदार चेता उर्फ रामजतन शर्मा याचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती मलबार हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय बगाडे यांनी दिली.