६० फूट रुंद रस्ता असला तरच दोन इतके चटईक्षेत्रफळ उपलब्ध करून देण्याच्या विद्यमान शासनाच्या नव्या विकास हक्क हस्तांतरण चटईक्षेत्रफळ (टीडीआर) धोरणामुळे शहर आणि उपनगरातील अनेक पुनर्विकास योजनांना मोठय़ा प्रमाणात खीळ बसली आहे. टीडीआरबाबत नव्याने येऊ घातलेल्या या धोरणाच्या मसुद्याविरुद्ध विकासक तसेच रहिवाशांनी तब्बल २४ हजारहून अधिक आक्षेप नोंदविले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबईत किती ठिकाणी ६० फूट रस्ता शिल्लक राहिला आहे, असा सवाल या प्रकरणी केला जात आहे. सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे नगरविकास विभागातील कुणीही अधिकारी याबाबत बोलण्यास तयार नाही.
मुंबईत शहरात १.३३ आणि उपनगरात दोन इतके चटईक्षेत्रफळ (एक चटईक्षेत्रफळ आणि एक टीडीआर) आतापर्यंत उपलब्ध होते, परंतु ७ मे रोजी जारी केलेल्या मसुद्यानुसार ९ मीटरपेक्षा म्हणजे ३० फुटापेक्षा कमी रस्ता असल्यास टीडीआर उपलब्ध होणार नाही. मुंबईत अनेक ठिकाणी ३० फुटापर्यंतचेच रस्ते आहेत. एकीकडे सागरी हद्द नियंत्रण कायद्याचा फटका समुद्राजवळील प्रकल्पांना बसला आहे. त्यातच या नव्या टीडीआर धोरणामुळे शहर आणि उपनगरातील अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडणार आहे. या अधिसूचनेवर हरकती व सूचना जारी करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती.
या काळात तब्बल २४ हजारहून अधिक हरकती नोंदविल्या गेल्याचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.  वांद्रे, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, चेंबूर, दादर, सायन, गिरगाव, काळबादेवी, परळ आदी परिसरांत अनेक इमारतींभोवतीचे रस्ते हे ३० ते ४० फूट आहेत. त्यामुळे त्यांना पूर्णपणे टीडीआर वापरता येणार नसल्याने यापैकी अनेक पुनर्विकास प्रकल्पात विकासकांनी रहिवाशांनी याआधी दिलेले चटईक्षेत्रफळ टीडीआरचे नवे धोरण मंजूर झाल्यानंतर आणखी कमी होईल, अशी अट टाकली आहे. अनेक प्रकल्पांवर सल्लागार असलेले वास्तुरचनाकार मिलिंद गोरक्ष म्हणाले की, रस्त्यांच्या रुंदीन्वये टीडीआर देण्याच्या नव्या धोरणाचा फायदा शहरातील काही बडय़ा विकासकांना होणार आहे. त्यांच्यासाठीच हे धोरण आणले का, अशी शंका घेण्यास वाव आहे. परळ येथील एका दोन बडय़ा विकासकांना या नव्या धोरणामुळे सरसकट २.५ इतके चटईक्षेत्रफळ टीडीआरच्या स्वरूपात वापरण्यास मिळणार आहे. विशेष म्हणजे या विकासकांनी पूर्वीचे ६० फूट रस्ते यासाठीच आवश्यकता नसताना आणखी वाढविले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
रस्त्याची रुंदी आणि अनुज्ञेय
असलेले चटईक्षेत्रफळ :
३० मीटर किंवा त्यापेक्षा अधिक – २.५
२४ ते ३० मीटर – २.२५
१८ ते २४ मीटर – २
१२ ते १८ मीटर – पॉइंट ७५
९ ते १२ मीटर – पॉइंट ५०